Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरदार वल्लभभाई पटेल आणि मर्हिष वाल्मिकी व स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन

        मुंबई, दि. 31 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोहपुरूष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. 

        मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

        सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्याही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

        मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, राष्ट्रीय ऐक्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व असे आहे. पूर्णतः वास्तववादी विचारसरणीच्या सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य संग्रामात तसेच पुढे संस्थांनांच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. अखंड आणि बलशाली भारत हा सरदार पटेल यांचा ध्यास होता. त्याचसाठी त्यांनी आयुष्य वेचले. सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या अखंड भारताच्या प्रयत्नांना वंदन करण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसांच्याही सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन      

        मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
        मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, आदिकवी महर्षी वाल्मिकी मानवी जीवनाला प्रगतीचा मार्ग दाखविणारे महान दार्शनिक होते. त्यांनी रामायण या महाकाव्यातून आपल्या समोर प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श जीवनपट मांडला. प्रभू श्रीरामांचे न्याय आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करणारे रामराज्य आजही आपल्यासाठी वंदनीय आहे. महर्षी वाल्मिकींचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आणि वंदनीय असेच आहे. जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मुख्यमंत्री यांच्याकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली


        मुंबई, दि. 31:-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली वाहिली आहे.

        मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.

        मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, कणखर आणि विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जगभरात ओळख होती. स्वर्गीय इंदिराजींचे भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान आहे. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी तसेच देशाला एकात्म, अखंड ठेवण्यासाठी त्यांनी कणखरपणे निर्णय घेतले. त्यासाठी त्यांना बलिदानही द्यावे लागले. त्यांच्या बलिदानातून आपल्याला देश महासत्ता बनविण्याची प्रेरणा घ्यावी लागेल. त्यासाठी आजच्या राष्ट्रीय संकल्प दिवसाचेही आपण गांभीर्यपूर्वक स्मरण करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

No comments