Breaking News

ब्रिटनचे उपायुक्त ॲलन गेमेल व मंत्रिपरिषदेच्या सदस्य कॅटी बज यांच्याशी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी साधला संवाद

        मुंबई - : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात कायम अग्रेसर असून कोविड काळातही मोठ्या प्रमाणात येथे परदेशी गुंतवणूक झाली आहे. याशिवाय पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्यातील पर्यटन स्थळांवरही अधिक सोयीसुविधा पुरविल्या जात असून जास्तीत जास्त पर्यटकांसाठी योग्य ती सुविधा पुरविण्याबरोबर स्थानिक रोजगार वाढविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे, असे राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले.

        लॉकडाऊनकाळानंतर राज्यातील परिस्थिती पूर्ववत होत असतांनाच राज्यातील उद्योग, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवकल्याण या विविध विभागांच्या माध्यमातून शासनाच्या ध्येय धोरणाविषयी राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शुक्रवारी ब्रिटीश हाय कमिशनचे उपायुक्त ॲलन गेमेल व मंत्रिपरिषदच्या सदस्य कॅटी बज यांच्याशी सदिच्छा भेटीअंतर्गत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

        कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या उद्योग, पर्यटन, कृषी, फलोत्पादन आदी क्षेत्रातील व्यवसायांवर मोठा परिणाम झाला. सध्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत या विभागांच्या माध्यमांतून राज्य करीत असलेल्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली. विशेषत: युवक व महिलांना कृषी व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी राज्य शासनामार्फत देण्यात येत असलेल्या विविध आर्थिक साहाय्याबाबत यावेळी राज्यमंत्री महोदयांनी ब्रिटीश प्रतिनिधींना माहिती दिली. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सद्यस्थिती व या ठिकाणी असलेली गुंतवणूकीची संधी, नैसर्गिक आपत्ती काळात महाराष्ट्राने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. 

        सुरूवातीला कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. परंतु शासनाने वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या माध्यमातून सध्या सर्व स्तरावर परिस्थिती पूर्ववत होत असल्याचेही राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

No comments