Breaking News

सन 2020 चा सातारा भूषण पुरस्कार प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना जाहीर

Satara Bhushan Award announced to famous kirtankar Charudatta Aphale
        सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा येथील रा गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिक यांच्यातर्फे प्रति वर्षी दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2020 साला साठी गेली 32 वर्षे आपल्या अमोघ वाणी व संगीताने समाजाला सुसंस्कारित करण्याचे कार्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार व अभिनेते चारुदत्त आफळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
        आफळे कुटुंबीय सातारा शहराजवळील क्षेत्र माहुली या गावचे. गेल्या पिढीतील तेजस्वी राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे चारुदत्त हे सुपुत्र. लहानपणापासून त्यांना वडिलांनी मार्गदर्शन केले व चारुदत्त यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिले कीर्तन केले पुढे दत्तदास बुवा घाग वगैरे ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन केले. एक कीर्तनकार म्हणून सर्वत्र नावाजले जाऊ लागले गेल्या 32 वर्षात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातही अनेक ठिकाणी आणि अमेरिका, इंग्लंड ,दुबई, मॉरिशस अशा अनेक ठिकाणी तब्बल पाच हजारहून अधिक कीर्तने केली आहेत .आपल्या कीर्तनातून श्रोत्यांना पारमार्थिक उपदेशाबरोबरच राष्ट्रवादाचे व सुसंस्कारांचे त्यांचे प्रबोधन अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे .याशिवाय संगीतावर ही त्यांचे प्रभुत्व असून शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व कुशल अभिनेते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत .अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत. त्याच बरोबर अनेक टीव्ही चॅनेल्सवर ही त्यांचे प्रबोधन पर कीर्तने व प्रवचने लोकप्रिय झाली आहेत. अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक टीव्ही चॅनेल्स वरील त्यांची प्रबोधन.
        बी. ए. पर्यंतचे औपचारिक शिक्षण पूर्ण करून ते मराठी संगीत रंगभूमीविषयक प्रबंधाचे संशोधन करीत असून तो पीएचडीसाठी सादर होणार आहे .त्यांना पुणे महानगरपालिका, बालगंधर्व संगीत मंडळ तसेच दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट वगैरे संस्थांकडून विशेष पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. त्यांचे सुसंस्कार करणारे व राष्ट्रप्रेम जागृत करणारे विचार सर्वांना मार्गदर्शक करणारे आहेत.
        गोडबोले ट्रस्ट तर्फे 1991 पासून प्रतिवर्षी ज्ञान-विज्ञान ,उद्योग ,कला, क्रीडा, समाजकार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्र सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. हे पुरस्काराचे २९ वें वर्ष असून यापूर्वी छोटा गंधर्व, तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी,प्रा. शिवाजीराव भोसले, शाहीर साबळे, धावपटू ललिता बाबर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, लेखक प्रताप गंगावणे, रयत शिक्षण संस्था,. ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, क्विक हिल चे काटकर बंधू अशा अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
यावर्षी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, ट्रस्ट चे विश्वस्त अशोक, डॉ. अच्युत व उदयन, प्रदुमन, डॉ. चैतन्य  गोडबोले यांच्या निवड समितीने  ही निवड केली आहे. रूपये 30000/- व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, तो दिवाळीनंतर समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कर सल्लागार साहित्य चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते अरुण गोडबोले यांनी दिली आहे.

No comments