Breaking News

भिकारी महिलेच्या खून प्रकरणी आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी ; अतिप्रसंग केल्याचा संशय बळावला

फलटण एसटी स्थानकाच्या बारामती प्लॅटफॉर्मवर या ठिकाणीच महिलेच्या खून करण्यात आला
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. 3 नोव्हेंबर 2020 - फलटण एसटी स्थानकाच्या, बारामती प्लॅटफॉर्म वर बसणाऱ्या भिकारी महिलेच्या खून प्रकरणात, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी अविनाश जाधव यास आज फलटण शहर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

        दरम्यान संशयीत आरोपीने हे कृत्य दारुच्या नशेत केले असून संबंधित महिलेवर त्याने अतिप्रसंग केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महिलेचा मृतदेह ताब्यात घेताना ती अर्धनग्न अवस्थेत होती, तर संशयित आरोपीही अर्धनग्न होता. काल सकाळी संशयित कपडे घालून पळून जात असताना, प्रकाश साळवे दिलीप जगताप, बाळू बिराडे या रिक्षा चालक युवकांनी त्या संशयितास पकडून ठेवले होते. 

        पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूंचा विचार करीत, त्या दृष्टीने तपास चालू केला असून, पोलिसांनी आरोपीस आज  न्यायालयात हजर केले असता,  न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलिसांनी या कामी श्वानपथक पाचारण केले होते, लवकरच या प्रकरणाचा गुंता पोलीस सोडवतील.

    भिकारी महिलेच्या खून प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, फलटण बसस्थानकाअंतर्गत बारामतीस जाण्यासाठी छोटेखानी बसस्थानक आहे. या ठिकाणी अॉफिस व लगतच प्रवाशांसाठी बसण्यासाठीचे शेड आहे. कोरोना संसर्गामुळे बसेस व प्रवाशी संख्या फारशी नसल्याने या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. या शेडमध्येच सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास आहे. तीला चालता येत नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून मागून घेवून तीचा उदरनिर्वाह सुरु होता. काल दि. २ रोजी सकाळी सातच्या सुमारास बसस्थानकातील सुरक्षा रक्षक दत्तात्रय सोनवलकर हे बसस्थानकातील लाईट बंद करीत होते. ते बारामती स्थानकातील लाईट बंद करण्यासाठी आले असता, त्यांना तेथील प्रवाशांसाठी असलेल्या शेडमध्ये एका बाकावर एक २५ ते ३० वयोगटातील इसम अर्धनग्न प्यान्ट न घातलेल्या स्वरुपात झोपला असल्याचे व बाकाखाली फरशीवर ५० ते ५५ वयोगटातील महिला पालथ्या अवस्थेत व अर्धनग्न अवस्थेत पडलेली दिसून आली. सदर महिलेच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येत होते. सोनवलकर यांनी हाका मारल्या परंतू त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. या नंतर सदर प्रकाराची कल्पना त्यांनी आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांना दिली. धुमाळ हे सोनवलकर यांच्यासमवेत गेले असता तेथे त्यांना संशयीत अविनाश जाधव यास तो पळून जाण्याच्या तयारीत असताना प्रकाश साळवे, दिलीप जगताप, बाळू बिराडे या रिक्षा चालक युवकांनी पकडून ठेवले होते. त्यावेळी त्याच्या प्यान्टवरती रक्ताचे डाग होते. त्याची विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव व पत्ता सांगितले. सदर प्रकाराची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी केलेल्या पाहणीत  संबंधित महिलेच्या आजूबाजूस रक्ताचे डाग होते. तिच्या तोंडावर मार लागलेला होता. तीला फरशीवर आपटून अथवा हत्याराने केलेल्या मारहाणीत तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. 
       दरम्यान सदर घटनास्थळास दुपारी पोलीस उप-अधिक्षक डॉ. निलेश देशमुख यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकातील श्वानास तेथे सापडलेल्या कपड्यांचा वास देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळावर आणलेल्या संशयीत अविनाश जाधव याच्या जवळ घुटमळले. घटनास्थळी पोलीसांना संशयीताच्या कपड्यासह दारुची बाटली, पेला, डिश आदी साहित्य मिळून आले. सदर घटनेची तक्रार दत्तात्रय सोनवलकर यांनी दिली आहे. पुढिल तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे करीत आहेत.

No comments