Breaking News

बारामती येथे होणारा दिवाळी कार्यक्रम पवार कुटुंबियांकडून रद्द

        गंधवार्ता वृत्तसेवा -  दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित उपस्थित राहून बारामती येथे दिवाळीचा सण साजरा करीत असतात. तसेच याप्रसंगी हितचिंतक, स्नेही, सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच पवार कुटुंबियांची भेट घेऊन शुभेच्छा देत असतात. परंतु यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी दिवाळीचा हा कार्यक्रम रद्द केला असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
  
        जाहीर केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की,  सर्व सन्माननीय मान्यवर, सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिक बंधु-भगिनी यांना, सस्नेह नमस्कार...

        बारामती येथे दरवर्षी पवार कुटुंबियांच्या एकत्रित उपस्थितीत परंपरेनुसार साजरा होणारा दिवाळीचा सण तसंच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या भेटीगाठी, शुभेच्छांचा पारंपरिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांनी, सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु- भगिनींनी यंदा बारामतीला न येता,  आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीची दिवाळी मात्र, आपल्या परंपरेनुसार उत्साहात, जल्लोषात बारामतीला पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन साजरी करुया.
        आपल्या सर्वांना दिवाळीच्या व नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना,  पत्रकाच्या खाली खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,  आमदार रोहित पवार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments