राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान
सुनिल शेट्टी, सोनू निगम, रिचा चड्डा, भारती लव्हेकर सन्मानित
मुंबई -: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे 10 वे भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अभिनेते सुनिल शेट्टी, पार्श्वगायक सोनू निगम, अभिनेत्री रिचा चड्डा आणि झरा खान, आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यासह दहा व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार कोरोना काळातील समाजकार्याबददल प्रदान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असून त्यांचे विचार भावी पिढ्यांनादेखील नेहमीच मार्गदर्शन करीत राहतील, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
संसदीय राजकारणात हार-जीत होत असते. परंतु समाजसेवेत नेहमी लोकांचे प्रेम मिळते. निस्वार्थ सेवेचा आनंद अवर्णनीय आहे. त्यामुळे सर्वांनी जीवनातील थोडा वेळ तरी समाजकार्यासाठी दिला पहिजे, असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
कोरोना काळात सामान्य लोकांना मदत केल्याबददल राज्यपालांच्या हस्ते इस्कॉन मंदिर, जुहू, सेंट पिटर्स चर्च, आययूव्ही फाउंडेशन, तसेच युवा संगीतकार तनिष्क बागची, साईबाबा हॉस्पिटलचे डॉ एन ए हेगडे, व्यवसायी मेहूल मेहता, समाजसेवक अब्दुल रहेमान वानू यांसह निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बुद्ध क्रिएशन ऑफ इंडियन सिनेमा या संस्थेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष कैलास मासूम व आश्रयदाते कृष्णा पिंपळे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अभिनेते अमन वर्मा यांनी केले.
No comments