फलटण येथे हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे यांची ग्वाही
गंधवार्ता वृत्तसेवा- फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किंमतीला विकावा लागत असल्याचे समोर येताच, शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधीत शेतकर्यांना दिली आहे.
फलटण, बारामती, माळशिरस येथे 35/40 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होत असे त्यातून येथे सहकारी व खाजगी जिनिंग फॅक्टरी उभ्या राहिल्या कोट्यावधीचा व्यापार, शेकडो हातांना काम, शेतकरी समाधानी अशी स्थिती होती, मात्र कापसावर आलेल्या बोंड आळी व अन्य रोगाने या भागातील कापूस पीक नामशेष झाल्याने शेती व व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
फलटण बारामती भागात कापूस उत्पादन पुन्हा सुरु : विक्रीची व्यवस्था नाही
त्यानंतर गेल्या 2/3 वर्षांपासून बारामती, फलटण तालुक्यात कापसाचे क्षेत्र वाढत असताना त्याच्या विक्रीची व्यवस्था नसल्याने त्याची कवडी मोलाने विक्री सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब काही कापूस उत्पादक शेतकर्यांनी महाराष्ट विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून देत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अथवा महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे माध्यमातून येथे शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कापूस विक्रीची गडबड करु नका शासकीय हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्याची ग्वाही श्रीमंत रामराजे यांनी कापूस उत्पादकांना दिली आहे.
फलटण तालुक्यात गोखळी, साठे, सरडे, गुणवरे, ढवळेवाडी वगैरे परिसरात यावर्षी सुमारे 300 एकर क्षेत्रावर कापूस लागण झाली असून कापूस उत्पादन सुरु झाले असताना त्यांच्या विक्रीची व्यवस्था नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.
रास्त दर मिळाला नाही तर हे पांढरे सोने पुन्हा नामशेष होणार
शासकीय हमीभाव प्रति क्विंटल 5800 रुपये असताना सध्या केवळ 4000/4500 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री करावा लागत असल्याने कापूस उत्पादन फायदेशीर नसल्याने शेतकरी त्यापासून दूर जाण्याचा धोका असल्याने शासनाने पूर्वी प्रमाणे कापूस खरेदी व प्रक्रिया केंद्र सुरु करुन कापसाला रास्त दर मिळवून देण्याबरोबर येथील बंद पडलेला प्रक्रिया उद्योग पुन्हा सुरु केल्यास शेकडो हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, प्रामुख्याने बेरोजगार तरुण आणि जिनिंग/प्रेसिंग विभागात महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे शेतकर्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधीत शासकीय यंत्रणेला तातडीने कार्यवाहीच्या सूचना देवून अहवाल मागविला आहे.
यावेळी आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खटकेवस्ती सरपंच बापुराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव गावडे, विद्यमान संचालक संतोष खटके, गोखळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज गावडे, नवनाथ गावडे (पाटील), योगेश गावडे (पाटील), राजेंद्र भागवत, योगेश जाधव, यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
No comments