Breaking News

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचारसंहिता सुरु;उद्या पर्यंत मतदार नोंदणी करता येणार

उद्या पर्यंत मतदार नोंदणी करता येणार

        सातारा दि. 4 -: केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषदेचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमानुसार 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

        केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार 12 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. 13  नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी, 17 नोव्हेंबर  अर्ज मागे घेणे, 1 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

        54 हजार 835 जणांनी पुणे विभाग पदवीधर मतदार यादीत नावे नोंद केली आहेत. अजुन काही जणांना नावे नोंद करावयाची असल्यास त्यांनी उद्या दि. 5 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत  तहसील कार्यालयात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. या अर्जांवर 12 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल. तसेच 7 हजार 618 जणांनी शिक्षक मतदार यादी नोंद केली आहे. 700 मतदारांमागे 16 किलो मिटरच्या अंतरात एक मतदान केंद्र असणार आहे.

        उमेदवारांची अर्जाची विक्री व अर्ज भरण्याची प्रक्रिया ही विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे होणार आहे. उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या लोकांपेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रचार करतांना मास्कचा, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर पाळले जाईल याचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. तसेच उमेदवारांच्या प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी विदेशी, देशी मद्य विक्री बंद असणार आहे. पदविधर व शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 2 नाव्हेंबर पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. लोकसभा व विधानसभेला जे नियम लागू होते तेच नियम या निवडणुकीलाही लागू राहतील, याचे राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी पालन करावे, असे आवाहनही प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले आहे.

No comments