Breaking News

श्रीराम साखर कारखान्याच्या कामगारांचे ग्रॅच्युइटीसाठी ऐन दिवाळीत उपोषण - ॲड. नरसिंह निकम

Shriram Sugar Factory workers go on hunger strike for gratuity

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार व रजेचा पगार अशी रक्कम या दोन्ही संस्थेकडे 2 ते 3 वर्षापासून पासून थकीत आहे, दिनांक 7 नोव्हेंबर 2020 पर्यंत श्रीराम कारखान्याने रक्कम दिली नाही तर दिनांक 9 नोव्हेंबर 2020 पासून ऐन दीपावलीच्या सणात बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी कळवले आहे.
        श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून सन २०१७ ते २०२० या सालात एकूण ६० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांची कारखान्याकडे व अर्कशाळेकडे सर्वांची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये ग्रॅच्युईटीची रक्कम थकीत आहे. त्याचप्रमाणे थकीत पगार व रजेचा पगार अशी येणे रक्कम आहे. वास्तविक पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट या कायद्यातील तरतुदीनुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधरा दिवसाचे आत संबंधीत संस्थेने ग्रॅच्युइटीची रक्कम कामगारांना देणे बंधनकारक आहे. परंतु गेली तीन वर्ष कामगारांनी अनेकवेळा हेलपाटे मारुन सुध्दा कारखान्याने त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम अद्याप दिली नाही. कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी, वयोवृध्द आई वडीलांच्या औषध पाण्यासाठी, दैनंदिन गरजेसाठी तसेच कामगारांना सुध्दा स्वत:च्या औषधपाण्यासाठी या रक्कमेची अत्यंत आवश्यकता आहे.

        असे असताना कारखान्याचे व्यवस्थापन ही रक्कम बुडविण्याच्या प्रयत्नात आहे. या आधीही सन २०१२ ते सन २०१७ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी सलग २१ दिवस उपोषण केलेनंतर व्यवस्थापनाला ग्रॅच्युइटीची रकम देणे भाग पडले होते. कारखाना हा विधानसभेची सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी संस्था आहे. विधान परिषदेत सभापतीच्या सहीने कायद्याला मंजुरी मिळते. परंतु त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कारखान्याचे व्यवस्थापन कायदा ढाब्यावर बसवून कामगारांची हक्काची रक्कम कामगारांना देत नाहीत. वास्तविक ग्रॅच्युइटीची रक्कम ३५ ते ४० वर्षे नोकरी करून घाम गाळुन कष्टाची व हक्काची रक्कम आहे. ही ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार, रजेचा पगार अशी एकूण सर्व कामगारांची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये श्रीराम कारखाना व डिस्टलरीकडे आहेत. या रकमेसाठी कामगारांनी अनेकवेळा कारखान्याकडे व नेतृत्वाकडे हेलपाटे घातले. त्याचप्रमाणे कामगार आयुक्त यांचेकडेही तक्रार केली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. विधानपरिषदेचे सभापती यांनी कारखान्याची मोळी टाकताना जाहीरपणे सांगितले की, कारखान्याला गतवैभव प्राप्त करून दिले. मग कारखान्याची १५ एकर जमीन कवडीमोल किंमतीने विक्री करून, तसेच कामगारांच्या कॉलन्या पाडून सभासदांच्या ठेवीच्या रकमा राईट ऑफ करून कामगारांची आर्थिक पिळवणूक करून, तसेच कारखाना चालविण्यास देवून सुध्दा कारखान्यावर ८० कोटी रुपये कर्ज कसे? असाही सवाल ॲड. नरसिंह निकम यांनी केला आहे. तसेच ॲड. नरसिंह निकम यांनी पुढे सांगितले की, फलटण तालुक्यात एकतर्फा सत्ता असलेने सर्व सामान्यांची मुस्कटदाबी व अन्याय होत आहे. परंतु फलटण तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, संघटीत व असंघटीत कामगार, व्यापारी, सर्वसामान्य जनता यांच्यावर अन्याय झालेस संघर्ष समितीच्या बॅनरखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करून यापुढेही अन्यायाला वाचा फोडून संबंधीतांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

        कारखाना ग्रॅच्युइटीची रक्कम देत नाही म्हणून अखेर कामगारांनी कारखान्याला सह्यांचे निवेदन देवून त्या निवेदनात दिनांक ७/११/२०२० पर्यंत कारखान्याने उर्वरीत रक्कम दिली नाही तर दिनांक ९/११/२०२० पासून ऐन दिपावलीच्या सणात फलटण तालुका संघर्ष समितीचे सदस्य ॲड. नरसिंह निकम यांचे नेतृत्वाखाली फलटण येथील अधिकारगृहासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत अशा आशयाचे निवेदन दिनांक २७/१०/२०२० रोजी कारखान्याला दिले आहे. 

No comments