श्रीराम साखर कारखान्याच्या कामगारांचे साखळी उपोषण सुरू
![]() |
ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेले श्रीरामचे कामगार |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ नोव्हेंबर - : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार व रजेचा पगाराची रक्कम कामगारांना मिळावी याकरिता ऐन दिवाळीत फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत कामगारांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांकडून करण्यात आला आहे. आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हॅली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून सन २०१७ ते २०२० या सालात एकूण ६० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांची कारखान्याकडे व अर्कशाळेकडे सर्वाची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये ग्रॅच्युइटीची रक्कम थकीत आहे. त्याचप्रमाणे थकीत पगार व रजेचा पगार अशी येणे रक्कम आहे. वास्तविक पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट या कायद्यातील तरतुदीनुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधरा दिवसाचे आत संबंधीत संस्थेने ग्रॅच्युइटीची रक्कम कामगारांना देणे बंधनकारक आहे. परंतु गेली तीन वर्ष कामगारांनी अनेकवेळा हेलपाटे मारुन सुध्दा कारखान्याने त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम अद्याप दिली नाही. कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी, वयोवृध्द वडीलांच्या औषध पाण्यासाठी, दैनंदिन गरजेसाठी तसेच कामगारांना सुध्दा स्वत:च्या औषधपाण्यासाठी या रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. असे असताना कारखान्याचे व्यवस्थापन ही रक्कम बुडविण्याच्या प्रयत्नात आहे असा कामगारांचा आरोप आहे. या आधीही सन २०१२ ते सन २०१७ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी सलग २१ दिवस उपोषण होते, तेव्हा व्यवस्थापनाला ग्रॅच्युइटीची रक्कम देणे भाग पडले होते. ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार, रजेचा पगार अशी एकूण सर्व कामगारांची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये श्रीराम कारखाना व डिस्टलरीकडे आहेत. या रकमेसाठी कामगारांनी अनेकवेळा कारखान्याकडे व नेतृत्वाकडे हेलपाटे घातले. त्याचप्रमाणे कामगार आयुक्त यांचेकडेही तक्रार केली, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे हक्काचे पैसे मिळण्यासाठी कामगारांनी तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास सुरुवात केली आहे.
No comments