Breaking News

शाळा सुरु करण्याबाबत समन्वयाने निर्णय घ्यावा – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Decision to start school should be taken in a coordinated manner - Deputy Speaker Dr. Neelam Gorhe

        मुंबई - : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा सुरु करत असताना शाळा संस्थाचालक आणि पालकांचे मत विचारात घेऊन परस्पर समन्वयाने शाळा उघडण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

        राज्यातील शाळांच्या समस्यांसंदर्भात त्यांनी दूरदृष्य प्रणालीमार्फत आढावा घेतला. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांच्यासह संबधित अधिकारी व शाळा संस्थाचालक प्रतिनीधी उपस्थित होते.

        शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर वर्गाच्या शाळांबाबत निर्णय घेतांना सर्व घटकांचे मत विचारात घेऊन निर्णय घेण्याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी सुचविले. डॉ.गोऱ्हे म्हणाल्या दहावी आणि बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने त्यांच्या परीक्षांबाबत प्राधान्याने निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे इतर वर्गांच्या शाळा सुरु करतांना शाळांचे निर्जंतुकीकरण, शौचालयाची व्यवस्था, मुलांची वाहतुक व्यवस्था या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे येथे तसेच इतर ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने वर्ग सुरु करण्याबाबत विचार व्हावा असेही डॉ.गोऱ्हे यांनी त्यांनी यावेळी सांगितले.

        ऑनलाईन शिक्षण, नवीन परीक्षा पद्धती आणि शाळांच्या फी संदर्भातील मते जाणून घेण्यासाठी लवकरच डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा संस्थाचालकांचे प्रतिनीधी आणि पालक प्रतिनिधी यांची बैठक बोलाविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments