Breaking News

‘स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद देते’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Governor felicitates Corona Warriors from private healthcare sector

        मुंबई -: कुठल्या पदासाठी, पैश्यांसाठी अथवा मानसन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद सुख देते. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही यास्तव मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा मानून आरोग्य सेवकांनी यापुढे देखील आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वैद्यकीय क्षेत्रातील करोना योद्ध्यांना केले.  देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके असून हे कार्य साध्य करणाऱ्या करोना वीर व वीरनारींच्या कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

        महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे राजभवन येथे कोरोना वीरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स,  दंतवैद्य,  विशेषज्ञ, फार्मसिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांसह खासगी आरोग्य क्षेत्रातील  50 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

        मनुष्य सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा आहे, ही सेवा करण्याचे भाग्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभले. देशातील खासगी डॉक्टरांनी व इतर आरोग्य सेवकांनी या संकट प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिल्यामुळेच भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे, असे गौरवोद्‌गार राज्यपालांनी यावेळी काढले.

        यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे निमंत्रक डॉ.अजित गोपछडे, मुंबई प्रदेश निमंत्रक डॉ. स्नेहा काळे, कान, नाक घसा तज्‍ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते डॉ. मेघना चौगुले लिखित ‘नॅचरोपॅथी ऑफ ब्रेन ट्यूमर्स विथ रेडिओलोजिक कोरिलेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

        डॉ.स्वप्नील मंत्री, डॉ.सचिन बागडिया, डॉ.गोविंद भदाणे, डॉ.सुनील आवारी, राकेश जैन, संजय धोत्रे,  डॉ.बाळासाहेब हरपाळे, डॉ.उज्‍ज्वला हाके, डॉ.अनुप मारार, डॉ.हृषीकेश नाईक, डॉ. विपुल जोशी, डॉ.चिन्मय देसाई आदींचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments