Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया ऑनलाईन होणार

Gram Panchayat election Candidate application process will be online

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशन पत्राची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने होणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर  https://panchayatelection.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देणेत आलेले आहेत. नामनिर्देशन पत्रे ऑनलाईन भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र व सेतु सुविधा केंद्र याठिकाणी उमेदवारांसाठी सुविधा पुरवण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली.

        ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-2021 च्या अनुषंगाने आज तहसिल कार्यालय येथे सर्व कार्यालय प्रमुख राजकीय पक्ष व पत्रकार यांची बैठक घेणेत आली.या बैठकीमध्ये तहसीलदार समीर यादव बोलत होते. याप्रसंगी प्रा. भीमदेव बुरुंगले, भगवानराव होळकर, जयकुमार शिंदे, जयकुमार इंगळे, पंकज पवार, सोपानराव जाधव यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नायब तहसीलदार आर.सी.पाटील उपस्थित होते.

        नामनिर्देशन साठी जात पडताळणी प्रमाणपत्र अथवा जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केले बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभाग फलटण येथून पोहोच घेवून ती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले.

        दि.11 डिसेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झालेली आहे. फलटण तालुक्यामध्ये एकूण 80 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत. आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व पोस्टर , बॅनर, काढन्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच सर्व कोणशीला झाकणेबाबत शासकीय कार्यालयांना सुचना देणेत आलेल्या आहेत.तसेच आचारसंहिता विषयक सर्व बाबींचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

        बैठकीमध्ये उपस्थितांना निवडणूकीचा कार्यक्रम सांगणेत आला. यामध्ये दि. 23/12/2020 ते दि.30/12/2020 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्रे स्विकारणेत येणार आहेत.दि.31/12/2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करणेत येणार आहे.दि.4/01/2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत पर्यंत नामनिर्देशन पत्राची माघारीसाठी मुदत असुन दुपारी 3.00 नंतर चिन्ह वाटप करण्यात येईल. मतदानाचा दि. 15/01/2021 असून मतमोजणी दि.18/01/2021 रोजी आहे.वरील सर्व प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम फलटण येथे होणार आहे.निवडणूकीसाठी मतदान हे संबंधित ग्रामपंचायतीमध्ये निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर होईल.

        या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 265 प्रभागामध्ये मतदान होणार असून यासाठी 48 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे.

No comments