राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ – क्रीडामंत्री सुनील केदार
पुणे :- राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली.
क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पूरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रीडाविषयक प्रगत अभ्यासक्रम राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक यांना करता यावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ असणे आवश्यक आहे, असेही श्री. केदार म्हणाले.
क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती असे सांगून श्री. केदार म्हणाले, या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रारुप विधेयकास मंत्रिमंडळासमोर मान्यताही देण्यात आली आहे. विधानमंडळ अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम महाराष्ट्र मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात पुण्यातील बालेवाडी येथे सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२०० कोटी याप्रमाणे एकूण रु.४०० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.
क्रीडा विद्यापीठ मिशन :
संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ तयार करणे.
क्रीडा विद्यापीठ दृष्टिकोन (व्हिजन) :
खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पूरक यंत्रणा तयार करणे.
क्रीडा विद्यापीठ ध्येय (मोटो) : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्र व भारत हे क्रीडा क्षेत्रात प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे.
क्रीडा विद्यापीठ उद्दिष्टे : भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे. क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे. प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे. क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे. क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे. आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपरिक देशी खेळांचा विकास करणे. समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करुन देणे. खेळाडू, क्रीडा तज्ञ, क्रीडा वैद्यक तज्ञ, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इत्यादींच्या सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे. अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करुन उत्तम दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक तयार करणे.
No comments