Breaking News

पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करु या - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

        सातारा  :  महा आवास अभियान- ग्रामीण हे  28 फेब्रुवारी 2021 अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजुंना  गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे  100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  केले.

        येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात आज महा आवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.

        कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवास योजनांची कामे रखडली आहेत, या कामांना महा आवास अभियानांतर्गत गती द्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, शहर जवळ असलेल्या गावांमध्ये घरकुल योजनेंतर्गत जमिनी खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढला पाहिजे. घरकुल योजना राबविण्यास अडचणी येत असतील तर त्या सर्व विभागांनी एकत्र बसून सोडविल्या पाहिजेत. घरकुल योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करा. यामध्ये सरपंच, पंचायत सभापती, सदस्य यांचा समावेश करावा. मंजुर व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्य व केंद्र पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यासाठी राज्य शासन पाठीशी आहे.  महा आवास अभियान-ग्रामीण जिल्ह्यात यशस्वी राबवा, असेही आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी कार्यशाळेत केले.

        ज्यांना घरकुले नाहीत अशांना 2022 पर्यंत घरकुले देण्याचा शासनाचा मानस असून या कामाला प्राधान्य द्यावे. महा आवास अभियान-ग्रामीण मध्ये प्रत्येक गावच्या सरपंचांचा सहभाग घ्यावा. गरीब व गरजुला स्वत:चे घर झाले तर वेगळचे समाधान असते. यात अंमलबजावणी अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग असला पाहिजे. सातारा जिल्हा परिषद विविध योजना राबविण्यात नेहमीच राज्यात आघाडीवर राहिली आहे. महा आवास अभियान सुद्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हा परिषद राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शासन पाठबळ देईल, असे आश्वास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या कार्यशाळेत दिले.

        अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असून घरकुलांबरोबर रोजगार निर्मितीवर भर द्यावा. तसेच महा आवास अभियान-ग्रामीण राबविण्याबात योग्य नियोजन करावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

        जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकाय यंत्रणेमार्फत गरीबांना घरकुले देण्यात येत असून शासनाने दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी कार्यशाळेत सांगितले.

        या कार्यशाळेत जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सर्वांसाठी घर खूप महत्वाचे आहे. घरकुलांसाठी जमिनीबाबत‍ तहसीलदारांसोबत गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल तसेच घरकुलांना लागणाऱ्या वाळूबाबत नियोजन करण्यात येईल.   शासकीय योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना गृह कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनीही पुढाकार घ्यावा.  तसेच महा आवास अभियान ग्रामीण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जिल्हा प्रथम राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

        महा आवास अभियानांतर्गत गुणवत्ता व दर्जेदार घरकुले उपलब्ध करुन देण्यात येणार असून हे अभियान लोकचळवळ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कार्यशाळेत सांगितले.

        प्रास्ताविकात ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी अभियान कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.

        या कार्यशाळेत सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी अन्य यंत्रणाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

No comments