‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक, कोणत्याही आमिषांना बळी पडू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार
MHADA process transparent, don't fall prey to any lure - Deputy Chief Minister Ajit Pawar's appeal
मुंबई - : ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागात ५ हजार ६४७ सदनिकांसाठी ‘म्हाडा’च्यावतीने सोडत काढण्यात आली आहे, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणात्याही आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ हजार ६४७ सदनिकांसाठी अर्ज नोंदणी आरंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ५ हजार ६४७ सदनिका व भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किंमतीत मिळणार आहेत. राज्यातील सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
‘कोरोना’च्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत असून घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून काम सुरु आहे. यापुढेही ‘म्हाडा’ने सर्वसामान्यांना परवडतील अशी पर्यावरणपूरक घरे निर्माण करावीत. त्यासाठी विविध प्रकल्प हाती घ्यावेत. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे मिळण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले. तर आभार मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी मानले.
No comments