एकात्मिक औषध विभाग स्थापन करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि एम्स एकत्रित कार्य करणार
नवी दिल्ली - आयुष मंत्रालय आणि एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने एकात्मिक औषध विभाग स्थापन करण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सीआयएमआरच्या पाहणीचा संयुक्त दौरा करून आढावा घेताना हा निर्णय घेतला आहे. आयुष मंत्रालयाकडे एक उत्कृष्टता योजना आहे, त्या माध्यमातून सीआयएमआरला चांगले सहकार्य प्राप्त होत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी सीआयएमआरचे प्रमुख डॉ. गौतम शर्मा आणि आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सीआयएमआरच्यावतीने सध्याच्या काळात अतिशय परिणामकारक ठरलेल्या योग आणि आयुर्वेद शाखांवर अत्याधुनिक पद्धतीने संशोधन करण्यात येत आहेत. त्यांचा आढावा घेऊन या संशोधनातून निघालेले निष्कर्ष पाहिल्यास आयुर्वेद किती प्रभावी आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता आणखी काही काळ संशोधन संयुक्तपणे सुरू ठेवण्याचा निर्णय आयुष आणि एम्सने घेतला आहे.
सीआयएमआरचे संशोधन कार्य आणि राबविण्यात येणारे इतर उपक्रम लक्षात घेऊन या संस्थेच्या विकासासाठी पुढच्या टप्प्यात सीआयएमआरसाठी स्वतंत्र ओपीडी आणि आयपीडी खाटांची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आयुष मंत्रालयाचे सचिव आणि एम्सच्या संचालकांनी सहमती दर्शवली आहे. सीआयएमआरमध्ये रूग्णांची वाढती संख्या, अनेकांना या उपचारामध्ये असणारी रूची आणि केंद्राच्या संशोधन कार्याचा वाढता व्यााप लक्षात घेऊन लवकरच एम्समधील एकात्मिक औषधाचा स्वतंत्र विभाग विकसित करणे शक्य आहे. एम्स विभागामध्ये कायम स्वरूपामध्ये असलेले प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या मदतीने या विभागाचे काम सुरू करणे शक्य होणार आहे.
एकात्मिक औषध विभागाच्या निर्मितीसाठी आयुष मंत्रालय सीआयएमआरला पाठिंबा देणार असल्याची माहिती यावेळी आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी दिली. कोविउ-19 महामारीच्या काळामध्ये सीआयएमआरने केलेल्या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष उल्लेखनीय आहेत. हे उत्साहवर्धक परिणाम लक्षात घेऊन यापुढे एकात्मिक औषध पद्धती स्विकारण्यात आली तर त्याचा उत्तम प्रभाव दिसून येईल. महामारीच्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्याला झालेले लाभ लक्षात घेऊन, संयुक्त औषधोपचाराची नितांत गरज असल्याचे दिसून आले आहे.
कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी आजार बरा झाल्यानंतरही काही काळजी घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी सीआयएमआर आणि एम्सच्यावतीने संयुक्त आयुर्वेद आणि योग यांच्या माध्यमातून औषधोपचार करताना एक संयुक्त संमत उपचार पद्धती –प्रोटोकॉल विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी हरियाणातल्या झज्जर येथील राष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्रामध्ये एकात्मिक आयुष कर्करोग दक्षता सुविधा सुरू करण्यासंबंधीच्या कार्याचा प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या सुविधा केंद्राचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सीआयएमआरमध्ये कोविड-19 विषयक सुरू असलेल्या संशोधनाच्या कामाचे सादरीकरण यावेळी वरिष्ठ वैद्यकीय अघिका-यांसमोर करण्यात आले. सध्याच्या काळामध्ये अतिशय आवश्यक असलेल्या औषधोपचाराविषयी सीआयएमआरच्या कर्मचा-यांनी केलेल्या संशोधनाविषयी आयुष सचिव आणि एम्सच्या संचालकांनी कौतुक केले. या विभागामध्ये अतिशय उच्च प्रतिचे उपचार आणि संशोधन होत असल्यामुळे त्याचे परिणामही चांगले मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
No comments