Breaking News

शरद पवारांचा पंटर, खबऱ्या....आ. गोपीचंद पडळकर यांची खा. संजय राऊत यांच्यावर टीका

MLA Gopichand Padalkar's criticism of MP Sanjay Raut

       गंधवार्ता वृत्तसेवा-  दैनिक सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता आ. गोपीचंद पडळकर यांनी खा. संजय राऊत यांना पत्र लिहून ते पत्र सोशल मीडियाच्या माध्यमावर प्रसिद्ध करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर प्रसिध्द केलेल्या पत्रात आ. गोपीचंद पडळकर यांनी असे म्हटले आहे की, मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्बोधन देऊन लिह शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद पडळकर असा केला आहे. या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला.

आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळे उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले आहे की महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे."

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करून ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश,मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदुःखाशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दुःखी धनगर समाजाचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही, ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चाना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळे लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमधे असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे याचा अंदाज तरी कसा येणार.

No comments