Breaking News

यंदा फलटणची रामयात्रा रद्द

Phaltan's Ramayatra canceled this year

        फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) -: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व खबरदारीची उपाययोजना म्हणून या वर्षाचा श्रीराम रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोना संपला नसून, तो कमी झाला आहे, खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी रामयात्रा रद्द करण्यात आली आहे, रामयात्रेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणारी  दुकाने, स्टॉल्स, फेरीवाले, खेळणी यांना बंदी घालण्यात आली आहे.  आदेशाचे उल्लंघन केल्यास नगर पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

        दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी  प्रभू श्री रामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडत असते. संस्थान काळापासून  सुरू असलेली ऐतिहासिक   प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा  यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द होत आहे. 

        कोरोनाचे संकट लक्षात घेता साध्या पद्धतीने गर्दी टाळून उत्सव साजरा करावा लागणार आहे. भाविकांनी या दिवशी प्रशासनास सहकार्य करुन घरीच थांबून प्रभू श्रीरामांचे पूजन करुन ‘कोरोना’ मुक्तीचे साकडे घालावे व पुढल्या वर्षी पुन्हा दरवर्षीप्रमाणे उत्साहात रथोत्सव साजरा करावा, असेही आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी नागरिकांना केले आहे.

        दरम्यान, रथोत्सवाच्या नियोजनासंबंधी प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी श्रीराम देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी. सामाजिक अंतराचे पालन करावे. मंदीर परिसरात दिवसातून 2 वेळा निर्जंतुकीकरण करावे असे सांगून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

No comments