Breaking News

कोरोना पार्श्वभूमीवर शिवप्रताप दिनी प्रशासनाकडून कलम 144 जारी

Section 144 issued by the administration on Shiv Pratap Day

        सातारा दि. 17 -: 21 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिनानिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नागरिक एकत्र येण्याची शक्यता असून त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणेकामी यावर्षी साजरा करणेत येणारा शिवप्रताप दिन अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह,  यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार 21 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस  पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत. सातारा जिल्हयात अद्यापही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व एकत्रित न येता लोकांनी  साजरे केले आहेत. त्यामुळे या वर्षी 21 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन उत्सव कोविडच्या पार्श्वभुमीवर पुर्ण खबरदारी घेवुन अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडण्यात यावा.  दरवर्षी प्रतापगडावर शासनामार्फत शिवप्रताप दिन साजरा केला जात असून इथे मोठया प्रमाणात नागरिक एकत्र येवून गर्दी होत असते. यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव विचारात घेता  प्रतापगडावर साजरा होणारा शिवप्रताप दिन फक्त शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीमध्येच साजरा करणेत यावा. शिवप्रताप दिन साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असलेने, कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजीत करणेस सक्त मनाई आहे.  नागरिक आकर्षित होऊन गर्दी होवू नये याकरीता कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींच्या प्रदर्शनास मनाई करणेत येत आहे. सदर कार्यक्रम ठिकाणी गर्दी होणार नाही याची आयोजकांनी खबरदारी घ्यावी. शिवप्रताप दिन उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.  उत्सव साजरा करणेचे ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी . तसेच सदर ठिकाणी शारिरीक अंतराचं ( फिजिकल डिस्टन्सींग ) तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क ,सॅनीटायझार इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असेही आदेशात नमूद आहे.

No comments