Breaking News

कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Success is guaranteed if you work with dedication in any field - Governor Bhagatsinh Koshyari

        पुणे, दि. १२ : कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

        वाघोली लेक्सीकॉन कॅम्पस येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा  ‘द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्ड’ ने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, लेक्सीकॉनचे संस्थापक एस.डी. शर्मा, अध्यक्ष पंकज शर्मा, उपाध्यक्ष नीरज शर्मा, लेक्सीकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर शेख उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, रंजनकुमार शर्मा, मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

        राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, लेक्सीकॉन संस्थेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून आदर्श समोर ठेवला आहे. समाजातील इतरांसमोर या सन्मानार्थींचे कार्य प्रेरणादायी असणार आहे, त्यामुळे असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. कोणतेही कार्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा असून कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केले तर निश्चितपणे यश मिळते. लेक्सीकॉन संस्थेच्या माध्यमातून शर्मा बंधूंनी प्रेरणादायी काम उभे केले आहे. यापुढील काळातही संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडेल, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.

        प्रास्ताविक उपाध्यक्ष नीरज शर्मा यांनी तर आभार लेक्सीकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर शेख यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

No comments