Breaking News

हा सुधारित कृषी कायदा नसून काळा कायदा आहे - आ.दिपक चव्हाण

शहरातून काढलेल्या फेरी प्रसंगी आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, सचिन सूर्यवंशी (बेडके), प्रदिप झणझणे व इतर मान्यवर 
This is not a revised agricultural law but a black law - MLA Deepak Chavan

फलटणमध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) - केंद्र सरकारने कृषिविषयक कायदे केले आहेत ते  पूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत.  या कायद्यामुळे पूर्वापार चालत आलेली सहकार चळवळ मोडीत निघणार आहे. या कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकरी भरडला जाणार आहे. केंद्र सरकार सांगते की हे सुधारित कायदे आहेत, परंतु हा सुधारित कायद नसून पूर्णतः काळा कायदा आहे, त्यामुळे हे कायदे रद्द करावेत अशी  मागणी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी केली. 

        केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरुन देशभरातील विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी वगैरेंनी मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, व शिवसेनेचा उत्स्फूर्त सहभाग होता. शेतकर्‍यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी फलटणकरांनी भारत बंद मध्ये सामील होऊन फलटण बंद ठेवण्याचे आवाहन, महाविकास आघाडी मधील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षांच्या वतीने संयुक्त रित्या करण्यात आले होते.
फलटणकरांचा  बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
        महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटणकरांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता,  फलटण शहरातील सर्व छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस,  शिवसेना वगैरे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरांतील प्रमुख मार्गावरुन फेरी काढून बंद मध्ये सहभागी व्यापारी, उद्योजक, फेरीवाले, टपरीधारक, हातगाडीवाले वगैरे सर्व घटकांना धन्यवाद दिले. 
शहरातून काढलेल्या फेरीस महिलांचीही उपस्थिती

      राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस नेते,  नगरसेवक व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), शिवसेना नेते प्रदिप झणझणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे वगैरेंच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिर येथे जमलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन फलटण शहरातून शांततेच्या मार्गाने  फेरी काढून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. श्रीराम मंदिर येथून निघालेली फेरी शिंपी गल्ली, रविवार पेठ, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, छ. शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गजानन चौक या मार्गाने शंकर मार्केट मार्गे  श्रीराम मंदिर येथे आली त्यावेळी आमदार दीपक चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलत होते.

         केंद्र शासनाने कृषी विषयक जो कायदा पारित केला आहे. तो कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्यामुळे  ताबडतोबीने  रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी करीत कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्याकडून  अभूतपूर्व असे आंदोलन केले जात आहे. याची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा गंभीर परिणाम होतील याची जाणीव यावेळी आ. दीपक चव्हाण यांनी करुन दिली.
         
      सकाळी काढण्यात आलेल्या फेरी प्रसंगी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले, सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, विजयकुमार लोंढे पाटिल, राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक महेंद्र सुर्यवंशी बेडके, माजी नगराध्यक्ष अड. बाबुराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, पंकज पवार, नितीन जाधव, प्रदीप मुळीक,  शाहुजी मदने, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, माजी नगरसेवक अनिल शिरतोडे वगैरे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
      उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

No comments