Breaking News

लडाखमधल्या त्सो कार पाणथळ प्रदेशाला आता ‘आंतरराष्ट्रीय आर्द्रभूमी’चे महत्व

The Tso Kar Wetlands in Ladakh now have the importance of 'international wetlands'

        नवी दिल्ली - भारताने लडाखमधल्या त्सो कार पाणथळ ठिकाणाला देशातले 42 वे ‘रामसर’ म्हणून घोषित केले आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशातले हे दुसरे पाणथळ ठिकाण आहे.

        पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज व्टिटरच्या माध्यमातून याविषयी माहिती सामायिक केली.

        सर्वात उंचस्थानी असलेल्या त्सो कार खोरे क्षेत्रामध्ये दोन मुख्य आणि महत्वाचे जलस्त्रोत आहेत. यामध्ये दक्षिणेकडच्या भागात जवळपास 438 हेक्टर क्षेत्रामध्ये पाणथळ जागा आहे. तर लडाखमध्ये उत्तरेकडे चांगथांग विभागात 1800 हेक्टर पाणथळ क्षेत्र आहे. याच स्थानाला त्सो कार म्हणजेच ‘श्वेत झील’- पांढरा तलाव असे नाव आहे. या तलावातल्या खारट पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे धवल कणांचे आगर तयार झाले आहे.

        लडाखमधले हे त्सो कार खोरे हे स्थलांतरित पक्ष्यांच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे स्थान आहे. कारण मध्य आशियातून येणारे स्थलांतरित पक्षी या खोऱ्यांमध्ये काही काळ थांबतात. तसेच काळ्या मानेचे सारस-करकोचा यासारखे अनेक पक्षी प्रजनन काळात या क्षेत्रामध्ये येतात.

        जागतिक जैव विविधतेच्या संवर्धनासाठी आणि या जैवसाखळीतील घटकांना बळकट करून टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका ठिकठिकाणच्या पाणथळ जागा म्हणजे ‘आर्द्रभूमी’ करीत असतात. त्यामुळे देशातल्या अशा पाणथळ जागांचे, आर्द्रभूमींची एक यादी म्हणजेच ‘रामसर सूची’ करण्यात येत आहे. आर्द्रभूमीचे आंतरराष्ट्रीय जाळे विकसित करण्याच्या उद्देशाने अशा जागांची देखभाल करण्यासाठी रामसर सूची महत्वाची आहे.

        निसर्गाच्या पर्यावरण शृंखलेमध्ये आर्द्रभूमी म्हणजेच पाणथळ ठिकाणांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. कारण अशा स्थानांमुळेच पर्यावरणाची परिसंस्था कार्यरत राहू शकते. सर्वांना अन्न, पाणी, भूजल पुनर्भरण, जल शुद्धीकरण, पूर नियंत्रण, जमिनीची धूप नियंत्रित करणे आणि हवामान नियमन यांच्यासाठी आर्द्रभूमीची गरज आहे. हे लक्षात घेऊन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने पाणथळ जागांच्या देखभालीचे काम सुरू करण्यात आले आहे. 

No comments