Breaking News

स्वातंत्र्य पूर्वकाळापासून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने लोकशाही संवर्धन केले - अरविंद मेहता

पत्रकार सुभाष भांबुरे यांचा सत्कार करताना अरविंद मेहता शेजारी सौ. वसुधा भांबुरे, दत्तात्रय जाधव
Vinayak Shinde, Subhashrao Bhambure, Ku. Swara Bhagwat was felicitated

          फलटण -: स्वातंत्र्यपूर्वकाळात आणि स्वातंत्र्यानंतरही वृत्तपत्रांनी लोकशाहीच्या संवर्धनासाठी केलेले काम प्रेरणादायी असल्याचे नमूद करीत, स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्याविरुद्ध समाजमन तयार करताना आणि गेल्या ७२ वर्षात स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची मांडणी किंवा राज्यकर्त्यांनी केलेली विकासाची कामे लोकांसमोर ठेवून त्यांना प्रोत्साहन देताना वृत्तपत्रांनी लोकशाही बळकट करण्याचे काम प्रामाणिकपणे केल्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.

त्रकार विनायक शिंदे यांचा सत्कार करताना प्रा. रमेश आढाव शेजारी सौ. सुषमा शिंदे

            फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने येथील शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन येथे आयोजित समारंभात फरांदवाडी कृषी क्रांती संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाषराव भांबुरे यांची, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांची महाराष्ट्र डिजीटल मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच गोखळी ता. फलटण येथील स्वरा भागवत या ६ वर्षाच्या चिमुकलीने सायकल चालविण्यात केलेल्या विक्रमाबद्दल या तिघांचा यथोचित सत्कार करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षपदावरुन मार्गदर्शन करताना अरविंद मेहता बोलत होते, प्रा. रमेश आढाव, ग्रामीण पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, गोखळीचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज गावडे, फरांदवाडी कृषी क्रांतीचे संस्थापक दत्तात्रय राऊत, राजेंद्र भागवत, योगेश भागवत स. रा. मोहिते, रघुनाथ कुंभार, नसीर शिकलगार, युवराज पवार, शक्ती भोसले, बाळासाहेब ननावरे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक मदने, सचिन निंबाळकर, बापूराव जगताप, अशोक सस्ते, यांच्यासह शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

कु. स्वरा भागवत हिचा सत्कार करताना श्रीरंग पवार शेजारी अरविंद मेहता, दिपक मदने

वृत्तपत्रे संकटात सापडली तरी जबाबदारी सांभाळण्यात माघार नाही

         अलीकडे दूरदर्शनवरील विविध वृत्तवाहिन्या, इलेट्रॉनिक सोशल मीडिया वगैरेंचे आकर्षण वाढत असताना शासनाचे धोरण वृत्तपत्रांपेक्षा या नव्या साधनांना प्राधान्य देण्याचे असल्याने काही प्रमाणात वृत्तपत्रे संकटात सापडली असली तरी त्यांनी आपली जबाबदारी सांभाळण्यात माघार घेतली नाही, त्याचप्रमाणे वाचकांचे पाठबळ आजही त्यांच्या पाठीशी असल्याने वृत्तपत्र आपली परंपरा जपण्यात किंबहुना लोकशाही संवर्धनात कमी पडणार नाहीत याची ग्वाही देत नवी साधनेही उपयोगाची आहेत मात्र त्याचा योग्य वापर आणि समाज प्रबोधनाची जबाबदारी या लोकांनी सांभाळली पाहिजे अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.

वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक विचारवंतांनी मार्गदर्शन केले

          सलग ५०/१०० वर्षे समाज प्रबोधन व लोकशाही संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आगरकर वगैरे कितीतरी नावे सांगता येतील अशा लोकांनी आपली मते मांडून समाजाला मार्गदर्शन केले आहे, आजही ते काम अव्याहत सुरु असताना सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यामध्ये सहभागी होऊन समाजहिताला प्राधान्य देऊन काम करावे अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.

स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या आदर्शांची पत्रकारिता

       फलटण येथील पत्रकारिता शिवसंदेशकार माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या विचारांची, आदर्शांची पाठराखण करीत सुरु असून त्यामधून अनेक नामवंत पत्रकार, वार्ताहर, लेखक तयार झाल्याचे नमूद करीत त्यापैकीच एक, फरांदवाडी कृषी क्रांतीचे चेअरमन पदी निवड झालेले सुभाषराव भांबुरे यांनी वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी म्हणून उत्तम काम करताना स्वतःची शेती, ट्रॅव्हल्स व्यवसाय, केटरिंग वगैरे मध्ये उत्तम काम केले, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे, महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेले विनायक शिंदे यांनी गेली सुमारे 25/30 वर्षे वृत्तपत्र  क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना तेथील सहकार्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका, जिल्हा, विभागीय अध्यक्षपदावरुन उत्तम काम केल्यानेच त्यांना नव्या क्षेत्रात राज्यस्तरावर कामाची संधी लाभली आहे, तेथेही ते उत्तम काम करतील असा विश्वास अरविंद मेहता यांनी व्यक्त केला.  

कुटुंबाची जबाबदारी पेलण्यात पत्नीची साथ मोलाची

        वृत्तपत्र किंवा सोशल मीडिया मध्ये काम करताना मिळणारे वेतन, मानधन पुरेसे नसल्याने प्रामाणिकपणे काम करणार्‍या या क्षेत्रातील अनेकांची कुचंबना होते, तीच स्थिती या दोघांची झाली परंतू सौ. वसुधा भांबुरे व सौ. सुषमा शिंदे यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे स्विकारल्याने कुटूंबातील वृद्धांचे आजारपण, मुलांची शिक्षणे, चरितार्थ चालविताना येणार्‍या अनंत अडचणी, शेतीची कामे याचा भार या दोघांवर फारसा आला नसल्याने आजच्या समारंभात या दोघांचा सपत्नीक सत्कार झाल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.

कु. स्वराची जडण घडण पिढीजात संस्कारातून

        गोखळी ता. फलटण येथील सामाजिक, सांस्कृतिक, वृत्तपत्र क्षेत्रातील जुने सहकारी राजेंद्र भागवत यांचे संपूर्ण कुटुंब वेगळे आहे, थोरा मोठ्यांचे विचार, आदर्श, संस्कृती यांच्या आधारावर वाटचाल करणार्‍या कुटुंबातील ६ वर्षीय सुकन्या कु. स्वरा भागवत हिने सायकलिंग व खेळात विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे, येथेही आज यथोचित सत्कार झाला. या संपूर्ण कुटुंबाला व्यायाम व खेळाची आवड आहे त्यातून कु. स्वरा हिने सायकलिंग, पोहणे वगैरे क्षेत्रात प्राविण्य मिळविल्याचे सांगून  अरविंद मेहता यांनी या तिघांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

फलटणच्या पत्रकारांचा वेगळा ठसा आणि आदर्श

          फलटण तालुक्यातील पत्रकारांनी आपला वेगळा ठसा स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकर यांच्या काळापासून निर्माण केला असून तो वारसा सर्वांनी जपून जोपासला असल्याचे नमूद करीत क्रांती म्हणजे बदल, जेथे काम करतो तेथे काय बदल होतोय,  यावर क्रांती अवलंबून असते म. फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती  केली, विविध क्षेत्रात क्रांती करणारी माणसे निर्माण झाल्याने हिंदुस्थानचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट करीत तीनही सत्कारमूर्तीच्या कार्याचे कौतुक करीत  प्रा. रमेश आढाव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सत्काराबद्दल कृतज्ञता

       सत्काराला उत्तरादाखल केलेल्या भाषणात सुभाषराव भांबुरे, विनायक शिंदे, छोटी बालिका कु. स्वरा भागवत हिने ही कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात डिजिटल मीडिया मध्ये नवतरुणांना उद्योग व्यवसाय व्यापाराची संधी प्राप्त होणार आहे. वेबसाईट माध्यमातून क्षणात जगात पोहोचता येत असून डिजिटल मीडिया भविष्यात प्रगती करणार असल्याचे महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे यांनी सांगितले.

        आपले काका, आजोबा व पप्पा यांचेकडून आपण खेळ व व्यायामाची प्रेरणा घेतली असून आपण गोखळी ते जेजुरी असा १४३ किलोमीटर सायकल प्रवास १२ तासात पूर्ण केला तो कुटुंब व समाजाने दिलेल्या प्रेरणेचा भाग असून भविष्यात आपण आयपीएस अधिकारी होणार असल्याचे मनोगत कु. स्वरा भागवत हिने व्यक्त केले.

        कार्यक्रमात प्रारंभी खेळात विशेष प्राविण्य मिळविलेली कु. स्वरा भागवत, फरांदवाडी ता. फलटण येथील कृषी क्रांती  कंपनी चेअरमनपदी निवड झालेले पत्रकार सुभाष भांबुरे  व महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले विनायक शिंदे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ पुष्पहार व पुस्तके देवून मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.

         कृषीक्रांती फार्मस प्रोडयुसर कंपनीचे संस्थापक दत्तात्रय राऊत,  स. रा. मोहिते, रघुनाथ कुंभार, श्रीरंग पवार यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार व नागरीक उपस्थित होते.

No comments