Breaking News

श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते रामरथाचे पूजन

रथाचे पूजन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर 

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 14 डिसेंबर - फलटण नगरीचे आराध्यदैवत श्री राम प्रभू यांचा दि. 15 डिसेंबर रोजी  होत असणारा रथोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द होत आहे.  परंपरेनुसार रथोत्सवाच्या आदल्या दिवशी रथाचे पूजन नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येते.  त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करत,  रथोत्सवाच्या आदल्या दिवशी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले.  लघूरुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी मानकरी शामराव निकम ( अलगुडे), दशरथ यादव, भाऊसाहेब यादव, सूर्यवंशी, रथाचे मानकरी ढेंबरे, शिंदे, अलगुडे, मुळीक, वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सहकार्याने गेली सुमारे २५० वर्षाहुन अधिक काळ प्रतिवर्षी मार्गशीर्ष शु|| प्रतिपदा म्हणजे देवदिवाळी दिवशी लाखोंच्या उपस्थितीत भरणारी येथील श्रीराम रथोत्सव यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी आज परंपरागत पद्धतीने आदल्या दिवशी रथपूजन विधीवत करण्यात आले.

   श्रीराम मंदिरासमोरील रथखान्यातून श्रीरामाचा परंपरागत रथ बाहेर काढून त्याची ट्रस्टी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा, आरती करण्यात आली, त्यावेळी सर्व मानकरी व नाईक निंबाळकर घराण्यातील मान्यवर उपस्थित होते.

     मार्गशीर्ष शु|| १ (प्रतिपदा) म्हणजे देवदिवाळी दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेस निघतो तथापी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामरथ यात्रा रद्द करण्यात आली असल्याने रथ नगर प्रदक्षिणेस निघणार नाही मात्र यात्रे दरम्यान असलेल्या विविध पूजा व अन्य विधी परंपरागत पद्धतीने होणार असून त्याचाच एक भाग म्हणून आज रथ पूजन करण्यात आल्याचे ट्रस्टच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

No comments