Breaking News

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

50 lakh grant for Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan - Announcement by Chief Minister 

        मुंबई  : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे.

        गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे, या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे  वातावरण निर्माण होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून त्यांनी या संमेलनाच्या आयोजनास आपल्या शुभेच्छाही दिल्या. डॉ जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी  लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी  आनंद व्यक्त केला आहे.

        अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी हे संमेलन डिसेंबर-जानेवारीत होणार होते परंतु कोरोना संकटामुळे मार्चमध्ये घ्यावे लागत आहे अशी माहिती दिली आहे.


No comments