आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पोंभूर्लेतील स्मारकाच्या दुरुस्ती, सुशोभिकरण, रस्तेविकासाचे काम दर्जेदार व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Acharya Balshastri Jambhekar's monument in Pombhurle should be repaired, beautified, road development work should be quality - Deputy Chief Minister Ajit Pawar
मुंबई, दि. ५ : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले येथील स्मारकाची व परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार करण्यात यावीत. त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
दि. ६ जानेवारी रोजी असलेल्या राज्यस्तरीय पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समिती कक्षात स्मारकाच्या दुरुस्ती, सुशोभिकरण व रस्ते विकासासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे (व्हीसीद्वारे), माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी (व्हीसीद्वारे), महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ, कार्यकारी विश्वस्त श्री. विजय मांडके आदी उपस्थित होते.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात रवींद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभूर्ले येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाबाबत सविस्तर माहिती दिली. त्याला उद्देशून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे पत्रकारितेतील योगदान लक्षात घेऊन अनेक मान्यवर या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात. या स्मारकाचे वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे काम दर्जेदार व आचार्यांच्या नावाला साजेशे असले पाहिजे. या स्मारकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्तेविकासाच्या कामालाही गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
उपमुख्यमंत्र्यांकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून राज्यातील पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषक पत्रकारितेला निर्भिड, नि:ष्पक्ष, लोकाभिमुख पत्रकारितेचा गौरवशाली वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
No comments