फलटण येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा
भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीस मान्यवरांनी मानवंदना दिली |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करून, मानवंदना देण्यात येणार होती, परंतु जिल्ह्यात लावण्यात आलेली जमावबंदी तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणि नूतन वर्ष यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, सदरचा विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम हा भीमस्फूर्ती भूमी (शेरी) मंगळवार पेठ फलटण येथे घेण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, एपीआय राऊळ साहेब, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ समिती पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना मान्यवर |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती च्या वतीने भीमस्फूर्ती भूमी (शेरी) मंगळवार पेठ फलटण येथे करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीस मान्यवर व विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी यांनी मानवंदना दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी जयंती मंडळ व विद्यार्थी व नागरिकांनी घोषणा देऊन भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा केला.
दरवर्षी १ जानेवारी रोजी, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी फलटण तालुक्यातून आंबेडकरी अनुयायी, संस्था - संघटना बहुसंख्येने जात असतात, परंतु यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथे न जाता, गावागावात आहे तिथेच विजयस्तंभाला अभिवादन करावे. तसेच शहरातील संस्था, संघटना व नागरिकांनी चार - चार च्या गटांमध्ये येऊन, विजयस्तंभ प्रतिकृतीस अभिवादन करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती (२०२१) फलटण यांच्यावतीने करण्यात आले होते. त्याप्रमाणे नागरिक संस्था संघटना व मान्यवर यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे व भीमस्फूर्ती भूमी (शेरी) मंगळवार पेठ फलटण येथे विजय स्तंभास मानवंदना दिली.
No comments