Breaking News

मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे, भव्य कलादालन साकारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

        मुंबई  :- मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.

        गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात सादरीकरण तसेच आढावा बैठक झाली.

        बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मु्ख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह नाटय व कला क्षेत्रातील आदेश बांदेकर, सुबोध भावे, विजय केंकरे आदी उपस्थित होते.

        मुख्यमंत्र्यांनी मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेशे असे भव्य कलादालन साकारण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, कलादानाची उभारणी करताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा तसेच अनुषांगीक प्रस्ताव सादर करण्यात यावा. तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

        पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर उभारण्यात येणाऱ्या या कलादानाची इमारत देखील देखणी आणि वास्तू कलेची उत्तम नमूना असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बैठकीत मराठी रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखविणाऱ्या कला दालनाची इमारत, बाह्य व अंतर्गत रचना यांसह विविध प्रकारच्या सुविधा याबबत सादरीकरण करण्यात आले.

No comments