मलठण मधील नागरिकांचा गुन्हेगारी - गुंडगिरी व अवैध धंद्याविरोधात मोर्चा
नागरिकांनी गुन्हेगारी - गुंडगिरी व अवैध धंद्याविरोधात काढलेला मोर्चा |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 28 जानेवारी 2021 - मलठण परिसरात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. रस्त्यात अडवून वाटमारी करणे, दहशत माजवणे, घरातील व घराबाहेरील वस्तू चोरून नेणे, अवैध धंदे अश्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, हा त्रास कायमचा बंद व्हावा व या प्रकरणी कडक कारवाई करून, मलठण मधील नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम व फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, गट नेते अशोकराव जाधव यांच्यासह नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस प्रशासनाकडे निवेदन देताना ॲड. नरसिंह निकम व समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव |
मलठण परिसरातील नागरिकांनी होत असलेल्या गुन्हेगारी व गुंडगिरीचा त्रास रोखण्यासाठी, काल दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी ॲड. नरसिंह निकम व समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली मलठण येथून पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून, होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवला आहे.
पोलीस प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सर्वजण मलठण येथील राहणारे असुन सध्या मलठणची लोकसंख्या १५,००० पर्यंत आहे. मलठण मध्ये गेली पाच वर्षां पासून प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याचप्रमाणे अवैध धंदे सुद्धा सुरू आहे. दिवसा ढवळया घरातील सोने, रोख रक्कम, पाण्याच्या मोटारी, साईकल, मोटर सायकल, मोबाईल व किरकोळ भंगार अशा वस्तु चोरीला जात आहेत. त्याचप्रमाणे भरदिवसा व रात्री सुद्धा लोकांना रस्त्यात अडवून चाकू व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून रोख रक्कम व मोबाईल काढून घेतला जात आहे.
त्याचप्रमाणे मोटार सायकल व चारचाकी अडवून गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवली जात आहे. रात्री बेरात्री दारु व गांजा पिऊन घरांवर दगडफेक करून दहशत माजवली जात आहे. त्याचप्रमाणे मलठण मधील महिलांच्या गळयातील मंगळसूत्रे चोरून नेले जात आहे. शाळेच्या मुलींच्या मागे लागून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व त्यांना लज्जा उत्पन्न् होईल असे हावभाव करण्याचा सर्रास प्रकार चालू आहे. त्याचप्रमाणे शेती शाळेत शिकणाऱ्या बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थाना आडवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून, त्यांचे कडून रोख रक्कुम व मोबाईल गळयातील चैन, अंगठी इ. वस्तु जबरदस्तीने काढून घेतले जात आहे.
त्याचप्रमाणे खाजगी सावकाराच्या नावाखाली गोरगरिबांकडून मोठया प्रमाणात व्याजाची रक्कम वसूल करून व्याजाच्या रकमेपोटी जमिन व राहती घरे नावावर करून घेतली जात आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर रित्या दारू भटया टाकून दारूची व गांजाची व्रिकी चालू आहे. हा सर्व प्रकारची गुन्हे इंदिरा नगर मलठण येथील राहणारे कै. मानिक जाधव यांची मुले व नातंवाडे हे सातत्याने करीत असून संपूर्ण मलठण परिसरात त्यांनी दहशत माजवली आहे. त्यामुळे संपूर्ण मलठण अशांत व अस्वस्थ आहे. सदर मले व नातंवडे यांचेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे फलटण शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनला नोंदलेले आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून, संघटित पणे एकत्रित गुन्हे करीत आहेत. याबाबत त्यांच्या विरूद्ध कोणी बोलल्यास ते घरातील त्यांच्या महिलांना पुढे करून उलट महिलांवरच अन्याय झाला असे खोटे चित्र उभे करीत आहेत. त्यांच्या घरातील महिलासुद्धा हया सर्व गुन्हयात सहभागी असून, त्यांचा गुन्हयात सक्रीय संबंध असतो. त्यांच्या या गुन्हे करण्याच्या प्रवृत्ती मुळे मलठण मधील महिला, विद्यार्थी, लहान मुले व मुली, नागरिक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. एकूणच मलठण मध्ये त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
तरी आपण स्वत : लक्ष घालून वरील इसमांवर कडक कारवाई करून त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासातून मलठण मधील नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा ही विनंती.
No comments