Breaking News

लसीची सुरक्षितता, परिणामकारकता आणि रोगप्रतिकारशक्ती याच्याशी कधीही तडजोड केली जाणार नाही : आरोग्यमंत्री

 कोविड-19 लसीकरणाची रंगीत तालीम देशभर संपन्न

       Covid-19 vaccination training conducted across the country

         नवी दिल्‍ली - देशात कोविड लसीकरणाची प्रत्यक्ष मोहीम सुरु होण्याच्या आधी, हे लसीकरण अभियान सुनियोजितपणे पार पाडण्याच्या सर्व टप्प्यातल्या तयारीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीने, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने आज देशभरातील 285 ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीपणे पूर्ण केली. देशातल्या प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण 125 जिल्ह्यांमध्ये ही सराव मोहीम झाली, यात नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांची समान निवड करण्यात आली होती.

        केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज दिल्लीतल्या दोन सराव स्थळांचा दौरा करुन कोविड लसीकरणाची पाहणी केली.

        शहादरा येथील जीटीबी रुग्णालयातल्या लसीकरणाच्या तयारीबद्दल  समाधान व्यक्त करत डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले की, ‘लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे पुढे नेली जात आहे, लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील व्यवस्थित सुरु आहे. लसीकरणाविषयी सविस्तर आणि सखोल चर्चा केल्यानंतर विविध हितसंबंधियांना सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या आहेत.”

        ‘को-विन’ या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कोविड लसीविषयीची अद्ययावत माहिती, जसे साठा किती उपलब्ध आहे, साठा करण्यासाठीचे तापमान आणि कोविड लस लाभार्थ्यांचा मागोवा घेतला जाणार आहे. आतापर्यंत को-विन प्लॅटफॉर्मवर 75 लाख लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचावी यासाठी, देशातील शीतगृह सुविधांचे पुरेसे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. सिरींज आणि इतर उपकरणे/सामानाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले.  

        कोविड लसीची सुरक्षितता आणि प्रभाव याबद्दल गैरसमजुती आणि अफवा पसरवल्या जात असून नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. समाज माध्यमांवर लसीच्या दुष्परिणामांबाबत चुकीचे संदेश प्रसारित केले जात असून त्यात अजिबात तथ्य नाही, असे डॉ हर्ष वर्धन  म्हणाले. लस आणि लसीकरणाबाबत कोणतेही वृत्त प्रसारित करण्याआधी सर्व प्रसारमाध्यमांनी पुरेशी काळजी घ्यावी, आणि सर्व तथ्यांची पडताळणी करुनच जबाबदारीने वृत्त प्रसारित करावे, असेही त्यांनी सांगितले.  

        भारताला, लसीकरणाच्या व्यापक मोहिमा चालवण्याचा पुरेसा अनुभव असून भारताइतका हा अनुभव अन्य कोणत्याही देशांकडे नाही, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. भारताने निग्रहीपणे आणि समर्पित वृत्तीने चालवलेल्या मोहिमेमुळेच, 2014 साली भारत पोलिओ-मुक्त देश होऊ शकला. पोलिओ लसीकरण मोहिमेत आपल्याला मिळालेल्या अनुभवाचा उपयोग देशभरात कोविड-19 लसीकरणासाठी होऊ शकेल, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

        दरियागंज येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतांना, डॉ हर्ष वर्धन यांनी पुन्हा एकदा कोविड-19 लसीची सुरक्षितता, प्रभाव आणि रोगप्रतिकारक्षमतेविषयी ग्वाही दिली.

        चार राज्यांत 28 आणि 29 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या लसीकरण सरावादरम्यान, कार्यपद्धती आणि माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारावर यंत्रणेत आणखी सुधारणा करण्याचे काम केले गेले, असे त्यांनी सांगितले. या रंगीत तालमीनंतर, जिल्हा आणि राज्य पातळीवर आढावा बैठका घेतल्या जातील. ज्यात सराव मोहीम राबवतांना आलेली आव्हाने आणि अडचणींवर चर्चा करून त्या दूर करण्याचे काम केले जाईल, अशी माहिती हर्ष वर्धन यांनी दिली. लसीकरणाच्या अंतिम मोहिमेत, या त्रुटी दूर करुन ती अधिकाधिक निर्दोष आणि प्रभावी केली जाईल, असेही ते म्हणाले.

No comments