कोव्हिड लसीकरण - फलटण तालुक्यामध्ये दि.१६ जानेवारी रोजी होणार सुरुवात
Covid vaccination will start on 16th January in Phaltan taluka
फलटण दि. 13 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोव्हीड लसीकरणासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला असून, येत्या शनिवारी दि १६ जानेवारी २०२१ रोजी फलटण तालुक्यामध्ये दोन ठिकाणी लसीकरण सत्र आयोजीत करण्यात आलेले आहे. त्यामध्ये फलटण शहरात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शंकर मार्केट (जूनी मंडई) फलटण व प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव ता.फलटण येथे पहिल्या टप्प्यामध्ये कोव्हीड लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे.
उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण तालुक्यात कोव्हीड (covid-19) लसीकरण पहिला टप्पा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यातील लसीकरण सत्रामध्ये सर्व शासकिय आरोग्य स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, खाजगी वैद्यकिय व्यवसायीक कर्मचारी,आशा व त्यांच्या दवाखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांची कोव्हीन ॲप मध्ये नोंदणी केलेली असून त्यांना कोव्हीड लसीकरण दोन डोस मध्ये देण्यात येणार आहे. लसीकरणाचे दोन डोस मधील अंतर ४ आठवडयाचे असेल. १० दिवसांमध्ये सर्व शासकिय आरोग्य कर्मचारी व खाजगी वैद्यकिय व्यवसायीक व त्यांचे कर्मचारी यांचे कोव्हीड लसीकरण करुन पहिला डोस पुर्ण करण्यात येणार आहे.या नंतर पोलीस कर्मचारी व फ्रंट लाईन कर्मचारी यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्र यामध्ये कोव्हीड लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी कोव्हीन ॲप मध्ये त्यांची वैयक्तीक माहिती भरणे गरजेचे आहे. त्यांनी फोटो आयडीसह जवळच्या, आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाच्या १ दिवस आगोदर त्यांना लसीकरणाचा दिनांक, ठिकाण, वेळ यांचा संदेश त्यांच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवर माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी आर. एम. जगदाळे यांनी दिली आहे.
No comments