Breaking News

रहिमतपूर नगर परिषदेकडून बांधलेल्या आदर्श रमाई घरकुलाचे जलसंपदा मंत्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

रमाई घरकुल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 48 घरकुलांचे वाटप प्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्षा सुरेखा माने व इतर 
Dedication of Adarsh Ramai Gharkula built by Rahimatpur Municipal Council 

        सातारा दि. 2   : रहिमतपूर नगर परिषदेने रमाई घरकुल योजनेंतर्गत उभारणी केलेल्या आदर्श घरकुलांचे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 48 कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर  उपलब्ध करुन देऊन अतिशय उत्तम काम केले आहे. रहिमतपूर नगर परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विकास कामांना शासनामार्फत आणखी निधी देण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

        रहिमतपूर नगर परिषदेमार्फत रमाई घरकुल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 48 घरकुलांचे वाटप आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, रहिमतपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, उपनगराध्यक्षा सुरेखा माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सुनिल माने, सारंग पाटील आदी उपस्थित होते.

रमाई घरकुल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या उद्घाटन करताना  जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील

        आजच्या काळात लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात गरीबांना घरे उपलब्ध करुन देण्याचे मोठे जिकरीचे झाले आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजना आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी टीम वर्क झाले तर एक चांगले काम होऊ शकते याचे उत्तम उदाहरण रहिमतपूर नगर परिषदेने घालून दिले आहे. शिक्षणामुळे आपल्या कुंटुंबाची प्रगती होते. या घरकुलातील व्यक्तींनी आपल्या मुलांना शिकवावे. रमाई घरकुल योजनेंतर्गत उत्तम घरकुले उपलब्ध करुन दिल्याबद्दल रहिमतपूर नगर परिषदेचे अभिनंदन करुन येत्या काळात रहिमतपूरच्या विकास कामांना गती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी श्री. पाटील यांनी शेवटी दिले.

        रहिमतपूर नगर परिषदेने रमाई घरकुल योजनेंतर्गत एक चांगली व सुसज्ज अशी वास्तु उभी केली आहे. रहिमतपूर परिसरात दळणवळणाची साधने वाढत असून भविष्यात येथील बाजार पेठही वाढणार आहे. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. राज्यातील अपुरे प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील विकास कामांना गती दिली जाईल, असे  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

        या कार्यक्रमामध्ये नगराध्यक्ष आनंदा कोरे, सुनिल माने यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात रहिमतपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी रमाई घरकुल योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

No comments