Breaking News

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते सातारा ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण

सातारा ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण करताना विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर

Dedication of Satara Grade Separator by Shrimant Ramraje, Chairman, Legislative Council

सातारा शहाराच्या वाहतुकीची समस्या ग्रेड सेपरेटरमुळे सुटेल आणि शहाराच्या वैभवात भर पडेल -  सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

        सातारा दि.29 (जिमाका) :  सातारच्या वाहतुकीतील अनेक वर्षांची समस्या या ग्रेड सेपरेटरमुळे सुटणार आहे. या ग्रेड सेपरेटरची देखभाल व्यवस्था उत्तम करावी, जेणे करून स्वच्छता राहील आणि शहाराच्या वैभवात भर पडेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

      पोवई नाका सातारा येथील ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती श्री. नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे, सुनिल माने आदी उपस्थित होते.  

ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण प्रसंगी बोलताना सभापती रामराजे नाईक निंबाळकर

      सातारा शहरातील नविन नागरी सुविधा ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून मिळणार आहे. पोलिस विभागाच्या माध्यमातून या ग्रेड सेपरेटरमध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठिकाणी सी सी टि.व्ही कॅमेरे लावावेत. केंद्र शासनाने व राज्य शासनाने ग्रेडसेपरेटरला निधी दिल्याबद्दल त्यांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण प्रसंगी बोलताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील

      यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अलिकडच्या काळात वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातूनच ग्रेड सेपरेटरची संकल्पना पुढे आली. केंद्र शासनाने 60 कोटी व राज्य शासनाने 16 कोटी दिले आहेत. ग्रेडसेपरेटरचे काम चांगल्या पध्दतीने झाले असून देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना  सातारा नगरपरिषदेला दिल्या आहेत. ग्रेडसेपरेटरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टि.व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. याचे नियंत्रण पोलिस विभागाबरोबरच स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मोठे स्क्रिन लावण्यात व्यवस्था करावी. यामुळे आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्हचा रेट कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी राज्याने तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण प्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

      यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, मुंबईनंतर मोठे ग्रेडसेपरेटरचे काम आपल्या सातारा शहरात झाले आहे ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या ग्रेड सेपरेटरचे देखभाल आतील सुरक्षा या दृष्टीने काम केले पाहिजे. ग्रेड सेपरेटरमुळे शहरातील गर्दी टाळण्यास मोठा उपयोग झाला आहे.

        यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ग्रेड सेपरेटरमधून जाताना वाहतुकीचे नियम पाळावेत तसेच ग्रेड सेपरेटरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी  निधीची तरतूद करण्यात यावी , अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments