उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन
पुणे, दि.१:- उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,आमदार अशोक पवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी सचिन बारवकर, संतोषकुमार देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ही शौर्याची भूमी आहे. अनेक प्रसंगात येथील नागरिकांनी शौर्य दाखविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण, उत्सव, महापुरुषाच्या जयंती साजरी करीत असताना नागरिकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेत कार्यक्रम साजरे केले आहेत. कोरोना विषाणूपासून संरक्षण करीत असताना आपल्या कुटुंबियांसोबत नागरिकांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग व प्रशासनाने नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी गर्दी टाळत घरातूनच या शूरवीरांना अभिवादन करावे, याकरिता प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, युट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमावर करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
No comments