Breaking News

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली

Georgian Ambassador meets Governor; seeks India’s cooperation in providing Covid vaccine

        मुंबई, दि. ८ : जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत अर्चिल झुलियाश्विली यांनी सांगितले.

        राजदूत झुलियाश्विली यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

        कोरोना उद्रेकानंतर भारताप्रमाणेच जॉर्जियाने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र देशात आज ५ ते ७ हजार कोरोना रुग्ण असल्याचे सांगून भारताने कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याबद्दल जॉर्जियाला मदत करावी असे राजदूतांनी सांगितले.

        भारत व जॉर्जियाचे संबंध पूर्वापार दृढ असल्याचे सांगून उभय देश बंदर विकास, तसेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसांत लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण देखील जॉर्जियात झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जॉर्जियाच्या राजदूतांचे स्वागत करताना भारत व जॉर्जिया देशांमध्ये बंदर विकास, उत्पादन क्षेत्र तसेच सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी बराच वाव असल्याचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असली तरी देखील देशाने कोरोनाचा मुकाबला समर्थपणे केल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

जॉर्जियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सतिंदर सिंह आहुजा देखील बैठकीला उपस्थित होते.

No comments