Breaking News

फलटण तालुक्यात ६ ग्रामपंचायत बिनविरोध ; ५७४ जागांसाठी १२७० उमेदवार निवडणूक आखाड्यात

ढवळेवाडी (निंभोरे) ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या नंतर श्रीमंत संजीवरजे नाइके निंबाळकर यांनी  सदस्यांचे अभिनंदन केले 

 फलटण - : फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सध्या सुरु असून त्यापैकी ६ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार आहेत, उर्वरित ७४ ग्रामपंचायती मधील ५७४ जागांसाठी १२७० उमेदवार निवडणूक आखाड्यात नशीब अजमावीत आहेत.

     दि. ३० डिसेंबर अखेर ७१२ जागांसाठी दाखल झालेल्या २४०८ उमेदवारी अर्जांपैकी २६ उमेदवारी अवैध ठरले असून उर्वरित २३८२ उमेदवारी अर्जांपैकी ९७० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले तर १३८ जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

    वाघोशी, रावडी खु||, तडवळे, डोंबाळवाडी, काशीदवाडी, ढवळेवाडी (निंभोरे) या ६ ग्रामपंचायत मधील जागाइतके उमेदवारी अर्ज राहिल्याने सदर ६ निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत, मात्र त्यांची अधिकृत घोषणा निवडणूक निकालाचे वेळी होणार आहे.

     खालील १४ ग्रामपंचायती मधील १८ प्रभागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदर ग्रामपंचायत व त्यासमोर बिनविरोध प्रभाग संख्या खालीलप्रमाणे - सांगवी २, विंचुर्णी १, बोडकेवाडी २, कोऱ्हाळे १, वडगाव १, कोरेगाव १, जिंती १, खुंटे १, पिराचीवाडी १, गुणवरे १, आंदरुड १, मिरढे १, शेरेशिंदेवाडी १, निरगुडी ३.

     निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील, सर्व ८० ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेसह प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असून पारदर्शकपणे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा  प्रयत्नशील असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे सहकार्य लाभत असल्याचे दिसून येत आहे.

    दरम्यान कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस अधिकारी/कर्मचारी, पोलीस पाटील प्रयत्नशील असून त्यांना ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

No comments