भाडळी येथे बेकायदेशीर बैलगाडी शर्यती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र काळजी व दक्षता घेण्यात येत आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे देखील शासनामार्फत आवाहन केले जात आहे. गावागावातील यात्रा-जत्रा व मोठे सण-उत्सव शासनाकडून तसेच स्थानिक पातळीवरून रद्द केले असतानाच, फलटण तालुक्यातील भाडळी येथे मात्र शासनाचे सर्व नियम, आदेश यांचे उल्लंघन करून, बेकायदेशीर बैलगाडी शर्यत घेण्यात आली आहे.
सध्या कोरोना विषाणूचा कहर सुरूच असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. प्रशासनाकडूनही विविध सण उत्सव - रद्द केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व संघटनांकडूनही विविध यात्रा - उत्सव या रद्द केल्या जात आहेत. शासनानेही अशा प्रकारचे गर्दी होणारे कार्यक्रम स्पर्धा भरवण्यात मनाई केली असताना, तसेच कायदेशीररित्या बैलगाडी स्पर्धा घेण्यास मनाई असताना कायद्याचे उल्लंघन करून, भाडळी ता. फलटण येथे बैलगाड्यांची शर्यत भरवण्यात आली आहे. कारवाई होत नसल्याने बैलगाडी शर्यत प्रेमींना कायद्याची भीतीच वाटत नसल्याने तालुक्यात वरचेवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात आहे. या रविवारी देखील भाडळी येथे बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती.
फलटण जवळच असलेल्या भाडळी येथील मुख्य रस्त्याच्या लगत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजल्यापासून शर्यतीच्या ठिकाणी चारचाकी मधून बैल व बैलगाड्या येण्यास सुरुवात झाली होती, बैलगाडी पळण्याच्या ठिकाणी चारी काढून बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आले होते. बघता बघता अनेक गाड्या मधून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरुण जमा झाले होते. यानंतर बैलांना बैलगाडीला जुंपून गुलाल टाकत शर्यती सुरू झाल्या अनेक तास या शर्यती बेधडकपणे सुरू होत्या.
हा सगळा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला असता, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील मुख्य पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा अनेकांना अनेक जणांनी फोन करून सदर भाडळी येथे बेकायदेशीरपणे बैलगाड्यांची शर्यत सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे. याबाबत तक्रार सांगितली परंतु फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी अथवा पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कारवाईची तसदी घेतली नाही.
No comments