Breaking News

भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघामध्ये फलटणच्या 3 मुलींचा समावेश

The Indian junior women's hockey team consists of 3 girls from Phaltan

        फलटण : भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघामध्ये फलटण तालुक्यातील तीन मुलींची निवड झाली असून हा संघ चिली येथील सॅंटियागो दौऱ्यावर रवाना झाला आहे.  फलटण तालुक्यातील मुलींचा समावेश भारतीय हॉकी संघामध्ये झाल्याने या मुलींचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे. 

            कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सारे जग ठप्प होते, परिणामी क्रीडा जगतही स्तब्ध होते. सुमारे एक वर्षाच्या मोठ्या कोरोना व्हायरस ब्रेक नंतर पुन्हा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. नुकत्याच भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची निवड करण्यात आली. सदर संघामध्ये फलटण तालुक्यातील कोळकी येथील ऋतुजा दादासो पिसाळ, वाखरी येथील अक्षता आबासाहेब ढेकळे व आसू येथील वैष्णवी विठ्ठल फाळके यांची निवड झाली आहे. यामधील ऋतुजा पिसाळ हिचे वडील फलटण येथील एका दुचाकी शोरुमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात तर अक्षता ढेकळे व वैष्णवी फाळके या सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील आहेत. ऋतुजा संघामध्ये आक्रमक फळीत ( फॉरवर्ड ), अक्षता संरक्षण फळीत ( डिफेंडर ) तर वैष्णवी मधल्या फळीत ( मीडफिल्डर ) खेळणार आहे. सदर मुलींना बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमधिल प्रशिक्षक अजित लाक्रा यांचे मार्गदर्शक लाभले आहे. नुकत्याच निवडी झालेला मुलींचा हा संघ चिली या देशामध्ये आयोजित हॉकी सामने खेळण्यासाठी रवाना झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गापुर्वी डिसेंबर २०१९ मध्ये अॉस्ट्रेलिया, न्यूझिलंड विरुध्द तीन राष्ट्रांच्या स्पर्धेत भारतीय संघ खेळला होता. आता चिली येथे रवाना झालेला संघ सहा सामने खेळणार आहे. यामध्ये  तेथील ज्यूनियर संघाबरोबर दि. १७ व १८ जानेवारी रोजी दोन सामने तर वरीष्ठ महिला संघाबरोबर दि. २०, २१, २३, २४ जानेवारी रोजी चार सामने खेळणार आहे. 

     या निवडीबद्दल ऋतुजा, अक्षता व वैष्णवी यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन व्यक्त होत आहे. 

No comments