Breaking News

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फुले वाड्यात केले अभिवादन

Social Justice Minister Dhananjay Munde greets Savitribai Phule at Phule Wada

        पुणे, दिनांक ३ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला शिक्षक दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज फुले वाडा येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी उपस्थित राहून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        ज्या सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले, सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्यांच्यामुळे आज महिला सक्षम झाल्या आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. आघाडी शासनाच्या वतीने मी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो,  असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुले वाड्याचा विकास करण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यानुसार फुले वाड्याचा पुनर्विकास केला जाईल, असेही शेवटी श्री.मुंडे यांनी सांगितले.

        यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सह आयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री प्रवीण कोरघंटीवार, सहायक आयुक्त उदय लोकापली यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments