Breaking News

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांची भीमा कोरेगाव ‘विजय स्तंभास’ मानवंदना

 Minister Dr. Raut's Bhima Koregaon 'Vijay Stambhas' Manavandana

        पुणे, दि. 1 जानेवारी 2021 - राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (दि.१ जानेवारी) शुक्रवारी सकाळी ६ वाजता भीमा कोरेगाव येथील ‘विजय स्तंभाला’ मानवंदना दिली. यानंतर त्यांनी वढु बु., तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले.

        ‘विजय स्तंभाला’ अभिवादन करण्यासाठी  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत पुणे दौऱ्यावर आले होते. नियोजित वेळेनुसार ठीक ६ वाजता त्यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना दिली. याप्रसंगी त्यांना नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

        "भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आणि या समितीचे प्रमुख दादासाहेब अभंग हे गेले दोन दशके सतत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडी सरकारची पूर्ण साथ लाभेल, अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. या परिसराचे सौंदर्यीकरण असो की या विजयस्तंभाच्या इतिहासाला त्या मागील समाजकारणांना साजेसे दालने, संग्रहालय येथे उभारणे गरजेचे आहे," असे मत त्यांनी नोंदवले.

        महाविकास आघाडी सरकार या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करील. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई  मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी आणि राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे आणि दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे," असे आश्वासन त्यांनी यावेळेस भीमा कोरेगाव येथे दिले. 

        संभाजी महाराज समाधीला अभिवादन - ऊर्जामंत्र्यांनी वढु बु, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व सिद्धनाथ महाराज गायकवाड यांच्या समाधी स्थळालाही डॉ. राऊत यांनी अभिवादन केले. तसेच सिध्दनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांचे निवासस्थानी भेट दिली. यावेळी गायकवाड कुटुंबियांसोबतच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला व गावच्या विकासावर चर्चा केली. तसेच त्यावेळी तैनात पोलिसांना डॉ राऊत यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

        हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना - सिद्धनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाडांच्या निवासस्थानी सकाळी 7 च्या सुमारास भेटीला जात असताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांना  लाईट असूनही पुरेसा प्रकाश जाणवला नाही. त्यामुळे  महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी संभाजी महाराज समाधी आणि गायकवाड समाधी परिसर रात्रीही प्रकाशाने उजळून  निघावा म्हणून तात्काळ हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना केल्या.

No comments