Breaking News

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचा नागपूर येथील नवीन कक्ष शासन आणि जनतेमधील दुवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

The new cell of the Maharashtra Legislative Secretariat at Nagpur is a link between the government and the people - Deputy Chief Minister Ajit Pawar

        मुंबई -: महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचा नागपूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेला कक्ष शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून काम करेल. नवीन कक्षाचा उपयोग विदर्भातील आमदारांबरोबरच विदर्भातील सामान्य जनतेलाही होईल. विदर्भातल्या जनतेची अनेक कामे या कक्षातूनच मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

        महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या, नागपूर येथील नवीन कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे बोलत होते. नवीन कक्षाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हीसीद्वारे विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधीमंडळाने हा कक्ष सुरु करुन, संसदीय कामकाजाच्या दृष्टीने एक नवीन, महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या कक्षाच्या माध्यमातून विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्याबरोबरच, विधीमंडळाची प्रतिष्ठा वाढण्यासही निश्चित मदत होणार आहे. यापुढच्या काळातही महाराष्ट्र विधीमंडळाचा सन्मान वाढविण्याचे, प्रतिष्ठा कायम राखण्याचे काम, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि समस्त नागरिकांकडून होईल.

        कोरोनामुळे यंदा नागपूरला हिवाळी अधिवेशन घेता आले नाही याची खंतही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परंतु नवीन वर्षात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल आणि पूर्वीप्रमाणे आपल्याला मोकळ्या वातावरणात फिरता येईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments