Breaking News

फलटण - बारामती रेल्वे काम त्वरित पूर्ण करावे - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Phaltan - Baramati railway work to be completed immediately - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

        फलटण (प्रतिनिधी) -  फलटण ते बारामती या रेल्वे मार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले असून या कामाला त्वरित गती देऊन हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच या रेल्वे मार्गासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी असहा सूचना सोलापूर रेल्वे विभागाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

         फलटण येथील तहसील कार्यालयामध्ये फलटण ते बारामती रेल्वे संदर्भात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, वरिष्ठ रेल्वे व्यवस्थापक सुनील मिश्रा ,मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मनोरंजन कुमार, प्रांताधिकारी डॉ शिवाजीराव जगताप,बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कोरेगावच्या प्रांत ज्योती पाटील, तहसीलदार समीर यादव, आदी उपस्थित होते.

        फलटण ते बारामती हा रेल्वे मार्ग झाल्यास दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला लवकरात लवकर मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. या मार्गामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर पडणारा अतिभार कमी होणार आहे. फलटण ते बारामती रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकार निधी देण्यास कमी पडणार नाही, मात्र अधिकाऱ्यांनी अडचणींचा बाऊ करू नये, फलटण - बारामती रेल्वे मार्ग लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याकडे जातीने लक्ष द्यावे, असे आदेश खासदार रणजितसिंह यांनी दिले.

फलटण ते बारामती या रेल्वे मार्गाचे काम खूपच संथ गतीने चालू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून, भूसंपादनाचे प्रश्न शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करून सोडवावेत, रेल्वे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. ज्या काही अडचणी फलटण ते बारामती या दरम्यान येत आहे, त्याबाबत सातारा व पुणे च्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे या मार्गाने काम लवकर होण्यासाठी सर्वांशी समनव्य ठेवणारा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा  अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

         लोणंद ते फलटण या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वे सेवाही सुरू झाली होती, मात्र मध्यंतरी कोरोना काळात रेल्वे बंद पडली असली तरी फलटण ते पुणे अशी रेल्वे आपण मागणी केल्याप्रमाणे लवकरच सुरू होणार असून, फलटण आणि सुरवडी रेल्वे स्टेशन वरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच इमारतीची रंग रंगोटी करावी. फलटण रेल्वे स्टेशन वर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे आदेश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

         आदर्की रेल्वे स्टेशन वर जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रवाशांची दमछाक होत असून एक तर हा रेल्वे मार्ग बदलावा किंवा रेल्वेने आदर्की गावातून रेल्वे स्टेशन पर्यंत रस्ता त्वरित करावा यासाठी वाटेल ते सहकार्य करण्याची ग्वाही खासदार रणजितसिंह यांनी दिली. रेणू शर्मा यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून फलटण ते बारामती रेल्वेमार्गावर येणाऱ्या अडचणी त्वरित दूर केल्या जातील, फलटण ते लोणंद रेल्वेमार्गाची पुन्हा पाहणी करून, या मार्गावरील सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली बैठकीनंतर फलटण रेल्वे स्टेशनची अधिकाऱ्यांसोबत खा रणजितसिंह यांनी पाहणी करून स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे आदेश दिले.

No comments