Breaking News

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण ; असा असेल लसीकरणाचा क्रम

Preparations for corona vaccination completed in the state; This will be the order of vaccination

राज्याला मिळाले ९ लाख ६३ हजार डोस; ५११ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज

        मुंबई - : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात ३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

        केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर “कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC) ” स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.

        लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

        फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

कोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दि. १२ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र

राज्यात शीतगृहाची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर ३४, महानगरपालिकास्तरावर २७, असे शीतगृह तयार असून ३ हजार १३५  शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉक इन कुलर – २१, वॉक इन फ्रिजर -४, आय एल.आर. ४१५३, डिप फ्रीजर- ३९३७ आहे.

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १२०० व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे व नाशिक या विभागीय स्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण

आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या अशी : अहमदनगर-२१, अकोला-५, अमरावती-९, औरंगाबाद-१८, बीड-९, भंडारा-५, बुलडाणा-१०, चंद्रपूर-११, धुळे-७, गडचिरोली-७, गोंदिया-६, हिंगोली-४, जळगाव-१३, जालना-८, कोल्हापूर-२०, लातूर-११, मुंबई-७२, नागपूर-२२, नांदेड-९, नंदूरबार-७, नाशिक-२३, उस्मानाबाद-५, पालघर-८, परभणी-५, पुणे-५५, रायगड-७, रत्नागिरी-9, सांगली-१७, सातारा-१६, सिंधूदुर्ग-६, सोलापूर-१९, ठाणे-४२, वर्धा-११, वाशिम-५, यवतमाळ-९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.

हे ५११ केंद्र राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महापालिका रुग्णालय याठिकाणी होणार असून त्यामध्ये ११९ ग्रामीण रुग्णालय, ८३ उपजिल्हा रुग्णालय, ६९ वैद्यकीय महाविद्यालय, ५९ नागरी आरोग्य केंद्र, ४३ महापालिका रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ खासगी रुग्णालय, २२ जिल्हा रुग्णालय, २२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ सामान्य रुग्णालय, ७ महापालिका रुग्णालय, ४ महिला रुग्णालय अशाप्रकारे ५११ लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत.

No comments