कोरोना लसीकरणाविषयी प्रधानमंत्री यांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
The Prime Minister interacted with the Chief Ministers of all the states on corona vaccination
मुंबई, दि. 11 : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.
वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषयी माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात होत आहे. राज्यात देखील त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करावी. पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदीं फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक तसेच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल याची दक्षता या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
लसीकरण मोहीम सुरू झाल्यावरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे याची नोंद घेतानाच लसीकरणांनतरही कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात अत्यावश्यक वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या दोन लसी ह्या देशातच निर्मित झाल्या आहेत याचा अभिमान आहे. या दोन्ही लसी जगातील अन्य लसींपेक्षा किफायतशीर आहेत. देशभरात पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट आणि गट दोन मधील सुमारे ३ कोटी लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना केंद्र शासनामार्फत लस पुरविली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि सहव्याधी असलेले ५० वर्षांच्या आतील नागरिकांना लसीकरण केले जाईल. लसीकरणाबाबतच्या अफवांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहनही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.
यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक, सदस्य डॉ.शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.
No comments