विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाने लोकप्रिय, अनुभवी व निष्ठावंत नेतृत्व हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Revenue Minister Balasaheb Thorat tribute to Vilaskaka Patil Undalkar
मुंबई, दि. 4 : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाने अत्यंत लोकप्रिय, अनुभवी व निष्ठावंत नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना श्री.थोरात म्हणाले की, विलासकाकांनी 1962 मध्ये जिल्हाबँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग 35 वर्षे प्रतिनिधित्व केलं. राज्याच्या मंत्रीमंडळात सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती.
राजकारणासोबतच सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. रयत सहकारी साखर कारखान्याची त्यांनी स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अग्रणी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ओळख निर्माण केली. अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्राची तसेच काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. विलासकाका पाटील उंडाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उंडाळकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असेही श्री. थोरात म्हणाले.
No comments