Breaking News

शेती पंपाला पूरेशी वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

Solar energy is a priority for agricultural pumps - Deputy Chief Minister Ajit Pawar

शिर्डीच्या राहूरी खुर्द ३३/११ उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

        शिर्डी  :- सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले.

        एकात्मिक ऊर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहूरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, श्रीरामपूर च्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होते.

        यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मागील काळात कोरोना प्रादुर्भावामुळे विकास कामे थांबली होती. शासनाने कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबविल्या. गोरगरिबांना मोफत धान्य पुरवठा केला, आरोग्य सेवा दिली. जनतेच्या आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. लॉकडाऊनमुळे शासनाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. केंद्र शासनाकडून अद्यापही राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. असे असले तरीही जिल्ह्याच्या विकास योजनेमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. आमदारांना त्यांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला.

        लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. विकास कामांना सुरुवात झाली असून कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेले निर्बंध कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ऊर्जा राज्यमंत्री राहूरी परिसराचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येथील विकास कामांना निधी अपुरा पडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकरी मोडला तर राज्य मोडते. शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याची काळजी महाविकास आघाडी शासन घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीच्या थकीत वीज बीलासाठी सवलत योजना शासनाने जाहीर केली आहे. राज्यातील 44 लाख शेती पंप ग्राहकांची सुमार 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. शासनाने शेती पंपाच्या बिलांवर सवलतीची योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी शेती पंपाचे सवलतीच्या दरातील वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे व शासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या तीन एचपी क्षमतेच्या मोटारी चालणे शक्य होणार आहे. मात्र सौर ऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची स्थानिकांनी काळजी घ्यावी. वांबोरी चारी प्रकल्प, ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत बाधणे, राहूरी बसस्थानक नुतनीकरणाच्या बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

        राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या भाषणात राहूरी परिसरातील नियोजित ऊर्जा प्रकल्पांची माहिती दिली. यामुळे शेतीला वीजेचा तुटवडा भासणार नाही असे सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेती पंपाच्या थकीत बिलावरील दंड माफ करुन व्याजात सवलत देण्यात आली असल्याने वीज देयक भरण्याचे त्यांनी आवाहन केले.

        मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राहूरी तालुक्यातील बाभूळगाव, वांबोरी, गणेगाव, आरडगांव, ताहाराबाद व शिरापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments