Breaking News

महाराष्ट्र पोलीस दलाचे खास अभिनंदन – गृहमंत्री अनिल देशमुख

Special congratulations to Maharashtra Police - Home Minister Anil Deshmukh

        मुंबई :-  कोविडच्‍या काळात नवीन वर्षानिमित्त होणारी गर्दी रोखण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर होती. एकीकडे सर्व नागरिक आपल्या कुटूंबासोबत नवीन वर्ष साजरे करीत होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे डोळ्यात तेल घालून रस्त्यावर पहारा देत होते. यामुळेच नवीन वर्षाच्या कार्यक्रमांस महाराष्ट्रात कोठेही गालबोट लागले नाही. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या कार्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

        कोणताही सणवार असो महाराष्ट्र पोलीस नेहमीच सतर्क राहून जनतेला पारंपरिकरित्या ते साजरे करता यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. त्याचप्रमाणे नवीन वर्षसुध्दा नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबत साजरे करता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज होते. मग ते मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर असो वा शेवटच्या टोकाच्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल असो. एकूणच काय तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने बंदोबस्त केला. त्यामुळे नवीन वर्षास कोणतेही गालबोट लागले नाही.

        कोविड-१९ च्या महामारीच्या काळात राज्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, आदी कर्मचाऱ्यांसमवेत पोलीस दलाने सुध्दा चांगल्याप्रकारे काम केलेले आहे आणि अजूनही कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. कोरोनाचा प्रकोप रोखण्याकरिता शिस्तबध्दरित्या काम करण्याची मोठी जबाबदारी पोलीसांवर आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबत हेही काम त्यांना करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत असतो आणि ते पुढेही करीत राहिल, असे मत गृहमत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

No comments