१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही ; लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ
मुंबई, दि. २० : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १०वी आणि १२वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती गायकवाड बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये तर इ. १२ वी ची परीक्षा दि.२३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षेचे त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
विशेष परीक्षा
एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.
लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ
दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे. परंतू यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.
प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी गृहपाठ
इ. १० वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात परंतु या वर्षी कोविड-१९ परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पद्धतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पद्धतीने २१ मे ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करावे लागणार आहे. इ. १२ वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भातील माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
विशिष्ट परिस्थितीत गृहपाठ सादर करण्यासाठी मुदतवाढ
कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात गृहपाठ सादर करावेत. इ.१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा गृहपाठ सादर करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील, अशी माहिती श्रीमती गायकवाड यांनी दिली.
कोविड-१९ बाबत सुरक्षात्मक उपाययोजना
परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबींसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. कोविड-१९ बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. परीक्षार्थी परीक्षेपासून कोणताही वंचित राहणार नाही याची राज्य शासनाने दक्षता घेतली आहे. परीक्षांबाबत अनेक वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होताना आढळून येत आहे. त्यामुळे घाबरुन न जाता विद्यार्थी आणि पालकांनी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजावी, असे आवाहनही श्रीमती गायकवाड यांनी यावेळी केले.
No comments