शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात राज्याची दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई - : शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात राज्याची दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना न्याय देण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना आवश्यक आहे. ही किमान अर्हता प्राप्त करण्यासाठी वाढीव संधी देण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. केंद्र सरकारला यासाठी पत्र पाठवून विनंतीदेखील करण्यात आली आहे.राज्यात 16 वेळा ही परीक्षा घेण्यात आली. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना ती आयुष्यभरासाठी लागू राहावी अशी शासनाची भूमिका आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सभापतींकडे लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गिरीशचन्द्र व्यास, विक्रम काळे कपिल पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
No comments